पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रिक्षा चालकाला वाचविताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस दुभाजकाला धडकली. सुदैवाने यामध्ये एकही प्रवासी जखमी झाला नाही. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सेंट मदर तेरेसा उड्डाणपूलाखाली घडली. बोरिवली ते पुणे ही बस महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने जात होती. चिंचवड येथून जात असताना एका रिक्षा चालकाने अरुंद जागेतून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. कोणताही अपघात होऊ नये, तसेच रिक्षाचे नुकसान होऊ नये यासाठी बस चालक तानाजी सरवदे यांनी बस डिव्हाइडरकडे वळवली.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड शहराचा विकास कोणी केला? शरद पवार की अजित पवार? दोन्ही गटाचे शहराध्यक्ष म्हणाले…
बस डिव्हायडरवर आदळली. बसचे पुढचा भाग चेपला आहे. बसममधील वीस प्रवासी, बस चालक आणि वाहक सर्वजण सुखरूप आहेत. दरम्यान, हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली. पोलिसांनी बघ्यांची गर्दी व संथ झालेली वाहतूक सुरळीत केली. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढील प्रवासासाठी पाठवून देण्यात आले आहे.