संजय जाधव, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : राज्यात करोना विषाणूचा उपप्रकार जेएन.१ चा संसर्ग सध्या सर्वाधिक प्रमाणात आढळून येत आहे. राज्यातील जेएन.१ च्या रुग्णांची संख्या ६६६ आहे. या उपप्रकाराचा संसर्ग वेगाने होत असल्याने सरसकट करोना रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण करू नये, अशी शिफारस कोविड कृती गटाने राज्य सरकारला केली आहे. यावर लवकरच राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

देशात जेएन.१ चा शिरकाव झाल्यानंतर राज्यात करोना रुग्णांना जेएन.१ ची बाधा झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण सुरू झाले. राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर इतर भागात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने कोविड कृती गटाची स्थापना केली. या गटाच्या अध्यक्षस्थानी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. त्यात नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. राजेश कार्यकर्ते, राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेतील डॉ. वर्षा पोतदार आणि पुण्यातील नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आरोग्य सेवा आयुक्त सदस्य सचिव आहेत.

आणखी वाचा-वहिनीचा खून करून सराइत गुन्हेगाराची मटण पार्टी; ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात करोनाच्या इतर उपप्रकारांपेक्षा जेएन.१ चा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळत आहे. त्यामुळे सरसकट करोना रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण करू नये, अशी शिफारस कृती गटाने सार्वजनिक आरोग्य विभागाला केली आहे. त्याऐवजी रुग्णालयात दाखल करोना रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याची सूचनाही कृती गटाने केली आहे. त्याबाबत आरोग्य विभागाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, राज्य सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

आणखी वाचा-पुणे : निवासी डॉक्टरांच्या लढ्याला यश! सरकारने उचलली तातडीने पावले

राज्यातील रुग्णसंख्या ६६१ वर

राज्यातील जेएन.१ ची एकूण रुग्णसंख्या आता ६६१ वर पोहोचली आहे. त्यातील सर्वाधिक ३३१ रुग्ण पुण्यात आढळले असून, त्या खालोखाल ठाणे ८८, नागपूर ५५, छत्रपती संभाजीनगर ५४, मुंबई ३६, अमरावती १८, रायगड १४, सोलापूर १३, कोल्हापूर ११, सांगली ७, जळगाव ५, रत्नागिरी ५, हिंगोली ४, अहमदनगर ३, बीड ३, चंद्रपूर ३, अकोला, गडचिरोली, जालना, नांदेड, नाशिक, धाराशिव प्रत्येकी २, नंदूरबार, सातारा, सिंधुदुर्ग, यवतमाळ प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे.

राज्यात करोनाच्या उपप्रकारांपैकी जेएन.१च्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे सरसकट करोना रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी रुग्णालयात दाखल करोना रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण करावे. -डॉ. राजेश कार्यकर्ते, राज्य समन्वयक, जनुकीय क्रमनिर्धारण

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In danger of corona covid task force says do not do genetic sequencing pune print news stj 05 mrj