पिंपरी चिंचवड: देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. २० फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरीष महाराज मोरे यांनी नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. मंगळवारी रात्री मोरे वरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नव्हते. त्यामुळे घरातील सदस्य वरती गेले. दरवाजा वाजविला पण दार उघडले जात नव्हते. आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे दार तोडण्यात आले. मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. दरम्यान, प्राथमिक दृष्ट्या आर्थिक विवंचेनेतून आत्महत्येचे केल्याचे कळत असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. दरम्यान, हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. २० फेब्रुवारीला रोजी मोरे यांचा विवाह होणार होता. आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dehu sant tukaram maharaj descendant shirish more committed suicide due to financial trouble kjp 91 css