पुणे : धनकवडी भागातील एका आयुर्वेदिक मसाज पार्लरमधील महिलेला धमकावून खंडणी उकळणाऱ्या तिघांना सहकारनगर पाेलिसांनी गजाआड केले. आरोपींनी मसाज पार्लरमधील महिलांना धमकावून खंडणी उकळण्याचे सात ते आठ गुन्हे केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत मिळाली आहे.

रोहित गुरुदत्त वाघमारे (वय २९, रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी), शुभम चांगदेव धनवटे (वय २०, रा. गणराज काॅम्प्लेक्स, अहिरे गेट, उत्तमनगर), राहुल ज्ञानदेव वाघमारे (वय ३६, रा. केळेवाडी, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वाघमारे, धनवटे, वाघमारे हे ३ मार्च रोजी धनकवडी भागातील एका आयुर्वेदिक मसाज पार्लरमध्ये गेले. आरोपींनी एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची बतावणी करुन महिलेशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर मसाज पार्लर बंद पाडण्याची धमकी दिली. महिलेने मसाज केल्यानंतर त्यांनी आम्ही मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रफीत काढली आहे. चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी त्यांनी दिली. त्यानंतर महिलेकडे खंडणी मागितली. महिलेकडे मोठी रक्कम नव्हती. त्यामुळे तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी गल्ल्यातील ८०० रुपयांची रोकड लुटून नेली. महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासात आरोपी वारजे माळवाडी भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोेलिसांच्या पथकाने तिघांना सापळा लावून पकडले. आरोपींनी अशा पद्धतीने शहरातील सात ते आठ मसाज पार्लरमध्ये शिरून खंडणी उकळण्याचे गुन्हे केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने आरोपींना बुधवारपर्यंत (१२ मार्चपर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक फौजदार बापू खुटवड, पोलीस हवालदार अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, सागर सुतकर, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, निखील राजिवडे, प्रदीप रेणुसे, आकाश कीर्तीकर, महेश भगत, अमित पद्मनाळे, योगेश ढोले, खंडू शिंदे यांनी ही कारवाई केली. आरोपींनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून, तक्ररदारांनी सहकारनगर पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.