पुणे : देशातून बासमती तांदळाची आजवरची विक्रमी निर्यात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ४८ हजार कोटी रुपये मूल्याच्या ५० लाख टन बासमती तांदळाची निर्यात झाली आहे. भारत बासमती तांदळाचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मागील दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत बासमती तांदळाच्या निर्यातीत ११.५ टक्क्यांनी वाढ होऊन ४४ हजार कोटी रुपये मूल्याच्या ४९ लाख टन तांदळाची निर्यात झाली होती. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आजवरची विक्रमी निर्यात झाली. सुमारे ४८ हजार कोटी रुपये मूल्याच्या ५० लाख टन तांदळाची निर्यात झाली आहे. ही विक्रमी निर्यात केवळ वजनाच्या बाबतच नाही, तर मूल्याच्या बाबतही विक्रमी निर्यात ठरली आहे.
दरम्यान, इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धामुळे वाहतुकीत अडथळे येत असल्यामुळे, तसेच वाहतूक महागल्यामुळे चालू आर्थिक वर्षात बासमती तांदळाच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. भारतातून अमेरिका, युरोपीय देश, ब्रिटन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, इराण, इराक आणि आशियाई देश अशा जगातील दीडशेहून जास्त देशांत बासमती तांदळाची निर्यात होते.
हेही वाचा : डाळींची टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारची धावाधाव
निर्यातीसाठी बासमतीचे दर प्रतिटन आठ ते १२ हजार रुपयांपर्यंत आहेत. भारतातून निर्यात होणाऱ्या बासमती तांदळामध्ये पारंपरिक बासमती, ११२१ बासमती, १५०९ बासमती, १४०१ बासमती, पूसा बासमती या वाणांचा समावेश असतो. देशात प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर या राज्यांत वेगवेगळ्या प्रकारच्या बासमती तांदळाचे उत्पादन होते. गंगा नदीच्या खोऱ्यात पाणी आणि जमिनीच्या गुणधर्मामुळे दर्जेदार बासमती तांदळाचे उत्पादन होते. भारतासह पाकिस्तानमध्ये काही प्रमाणात बासमतीचे उत्पादन होते.
हेही वाचा : काँग्रेसमुळे पुन्हा फाळणीचा धोका! सोलापूरच्या सभेत पंतप्रधानांचा आरोप
निर्यातीसाठी पोषक स्थिती
देशातून बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यामुळे जगभरात बिगरबासमती तांदूळ खाणाऱ्यांनी बासमती तांदळाला प्राधान्य दिले. पाकिस्तानमधून बासमती तांदळाची निर्यात होते; पण राजकीय अस्थिरता, निवडणुकांमुळे पाकिस्तानमधून होणारी निर्यात घटली. परिणामी भारतीय बासमतीची निर्यात वाढली. मागील वर्षात बासमतीचे चांगले उत्पादन झाले होते. वर्षभर दर स्थिर होते. एकूण स्थिती बासमतीच्या निर्यातीला पोषक होती, अशी माहिती तांदळाचे निर्यातदार राजेश शहा यांनी दिली.