‘ जगातील एकूण लोकसंख्येपैकी वीस टक्के लोकांना हृदयविकाराचा धोका संभवतो. हृदयविकार होऊ नये म्हणून जागतिक पातळीवर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा आटोक्यात ठेवण्याचे प्रयत्न होत असूनही त्यांना म्हणावे तसे यश मिळत नाही. भविष्यात जनुकीय पद्धती वापरून हृदयविकार टाळण्याचा प्रयत्न झाल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकेल,’ असे मत स्पेनच्या ‘डॉ. नेग्रिन युनिव्हर्सिटी हॉस्पिटल’ मधील संशोधन विभागाचे सहसंस्थापक डॉ. अल्फान्सो मदिना यांनी व्यक्त केले. ते रुबी हॉल क्लिनिक येथे पत्रकारांशी बोलत होते.
अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेत वापरले जाणारे ‘बायो अब्सॉर्बेबल व्हॅस्क्युलर स्कॅफोल्ड’ प्रकारचे स्टेंट हृदयशस्त्रक्रियेतील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान असल्याचे डॉ. मदिना यांनी सांगितले. रुग्णालयातील ‘कॅथ लॅब’ चे संचालक डॉ. शिरीष हिरेमठ आणि डॉ. चंद्रशेखर मखळे यांनी या स्टेंटविषयी माहिती दिली.
अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान बंद झालेली धमनी फुगवून तिथे रक्तप्रवाह सुरू करण्यासाठी वापरले जाणारे हे स्टेंट शस्त्रक्रियेनंतरच्या दोन वर्षांत पूर्णपणे विरघळून जाते. रुग्णाच्या त्याच धमनीवर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागल्यास ती सुकर होणे तसेच रक्त पातळ करण्यासाठीच्या औषधांवरील रुग्णाचे अवलंबित्व कमी करता येणे या स्टेंटमुळे शक्य होऊ शकते, असे या वेळी सांगण्यात आले. या स्टेंटची किंमत मात्र धातूच्या स्टेंटपेक्षा दुप्पट असून ते सुमारे पावणेतीन लाख रुपयांना उपलब्ध होऊ शकते. 

Story img Loader