पुणे : वादातून टोळक्याने नऊ वाहनांची तोडफोड केल्याची घटना हडपसर भागातील काळेपडळ परिसरात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी साहिल कांबळे याच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक उद्धव झगडे (वय २४, रा.स्वराज पार्क, म्हसोबा मंदिराजवळ, काळेपडळ, हडपसर ) याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे आणि झगडे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. झगडे रागाने बघत असल्याने कांबळे आणि साथीदार काळेपडळ भागात सोमवारी दुपारी आले. त्यांन शिवीगाळ करून परिसरात दहशत माजविली. लाकडी दांडके उगारून धमकावले. त्यानंतर दांडक्याने दोन मोटारींसह टेम्पो, रिक्षांच्या काचा फोडल्या. दगडफेक करून कांबळे आणि साथीदार पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा : वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी काहीजण सामील, खुनापूर्वी आरोपींकडून गोळीबाराचा सराव
पोलिसांनी कांबळेला रात्री उशीरा अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक फौजदार साबळे तपास करत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. किरकोळ वादातून सामान्यांची वाहनांची तोडफोड केली जाते. उपनगरात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतात. नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.