पुणे : कोथरुड भागातून अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांकडून बाँब तयार करण्याचे साहित्य, पांढऱ्या रंगाची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी बाँब तयार करण्यासाठी कोंढव्यातील राहत्या घरात छोटी प्रयोगशाळा थाटल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे.

कोथरूडमधून दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असताना महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा, मूळ रा. रतलाम, मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली होती. दोघांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा. कोंढवा) याला देखील अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या अभियंता सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. कौसरबाग, कोंढवा, मूळ रा. पंढरी, रत्नागिरी) याला रत्नागिरीतून अटक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) करण्यात येत आहे. काझी याने खान आणि साकी यांना आर्थिक रसद पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

खान आणि साकी कोंढव्यातील मिठानगर भागात राहत हाेते. सोमवारी एटीएसच्या पथकाने दहशतवाद्यांच्या घरातून बाँब तयार करण्याचे साहित्य जप्त केले. दोघांनी बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ आणि विविध उपकरणे घरात लपवून ठेवली होती. एटीएसने दोघांची कसून चौकशी केली. खान आणि साकी यांच्याकडून रासायनिक पावडर, चारकोल, थर्मामिटर, ड्रॉपर, सोल्डिंग गन, मल्टीमीटर, छोटे बल्ब, बॅटरी, घड्याळ (अलार्म क्लॉक) तसेच दुचाकी चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

अभियंता सिमाब काझी याने दहशतवाद्यांसाठी थर्मामीटर, ड्रॉपर, पिपेट असे साहित्य खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झाले असून खरेदी केलेली ठिकाणे या दहशतवाद्यांनी दाखवली आहेत. काझी याने दहशतवाद्यांना रोख आणि ऑनलाइन पद्धतीने पैशाची मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खान आणि साकी यांनी कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी घेतली होती. खान आणि साकी जंगलात वास्तव्यास होते. त्यांच्याकडून तंबू जप्त करण्यात आला होता.