पुणे : इंदापूर तहसील कार्यालयात केलेल्या अर्जावर तहसीलदारांची सही घेण्यासाठी एकाकडून २५ हजारांची लाच घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. याप्रकरणी महिलेविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी कावेरी विजय खाडे (वय ४८) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाडेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. इंदापूर परिसरातील माौजे भांडगाव तक्रारादाच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. जमिनीच्या परिसरात रस्ता तयार करण्यासाठी परवानागी मिळावी, असा अर्ज तक्रारदाराने इंदापूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. अंतिम आदेशावर सही घेण्यासाटी तहसीलदारांची सही घेण्यासाठी तहसील कार्यालयातील महसूल सहायक खाडे हिने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
तक्रारदाराला खाडेने लाचेची रक्कम घेऊन तहसील कार्यालयात शुक्रवारी बोलाविले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून खाडेला तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच घेताना पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे तपास करत आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (दूरध्वनी- ०२०-२६१२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३) तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.