इंदापूर: शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा -भीमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या मुदती अखेर संचालकाच्या एकवीस जागांसाठी एकवीसच उमेदवारी अर्ज निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याने या कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली आहे. कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या पंचवीस वर्षात सलग पाच निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन १९९९ मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. कारखाना कार्यक्षेत्रातील सेचाळीस गावांमधील सभासदांनी व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीकरिता सहकार्याची भूमिका घेतली, त्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.

बिनविरोध उमेदवार पुढीलप्रमाणे :

•बावडा गट:-पाटील हर्षवर्धन शहाजीराव, पाटील प्रतापराव सर्जेराव, पाटील उमेश अच्युतराव

•पिंपरी गट:- मोहिते प्रकाश शहाजी, बोडके संजय तुळशीराम, विजय दत्तात्रय घोगरे.

•सुरवड गट:- शिर्के महेशकुमार दत्तात्रय, घोगरे दादासो उत्‍तम, गायकवाड सुभाष किसन

•काटी गट :- पवार लालासो देविदास, जाधव राजकुमार वसंतराव, वाघमोडे विलास रामचंद्र
•रेडणी गट :- बोंद्रे आनंदराव नामदेव, देवकर राजेंद्र व्यंकट, सवासे दत्तू यशवंत

•अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्ग:- कांबळे राहुल अरुण

•इतर मागास प्रवर्ग:- यादव कृष्णाजी दशरथ

•भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग:- नाईक रामचंद्र नामदेव

•ब वर्ग सभासद प्रवर्ग :- पाटील भाग्यश्री हर्षवर्धन

•महिला राखीव प्रवर्ग:- पोळ संगिता दत्तात्रय, शिंदे कल्पना निवृत्ती

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे व इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काम पहिले.

उदयसिंह पाटील यांच्या मनाच्या मोठेपणाचे सर्वांकडून कौतुक!

कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणेसाठी विद्यमान संचालक उदयसिंह पाटील यांनी बावडा गटातून स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय हा तहसील कार्यालयामध्ये शेवटच्या दोन मिनिटात घेतला. त्यामुळे हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील यांना तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु उदयसिंह पाटील यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आपला निर्णय कायम ठेवला. त्यानंतर भाग्यश्री बंगल्यावर कार्यकर्त्यांसमोर बोलताना उदयसिंह पाटील यांनी सांगितले की, सध्या आपले नेते हर्षवर्धन पाटील (भाऊ) हे विधानसभा निवडणुकीतील अपयशाने राजकीय पदावर नाहीत, त्यामुळे कारखाना निवडणूक बिनविरोध होणे हे राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या प्रतिष्ठितेसाठी आवश्यक होते.त्यांच्या राजकीय अडचणीच्या काळात तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी पदासाठी वेळ प्रसंगी नाराज न होता एक पाऊल मागे घेण्याची गरज होती. अनेकांनी मनाचा मोठेपणा दाखवला.

याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कोणाचेही अडचणीचे राजकीय दिवस कायम राहत नसतात. तसेच कारखान्याच्या पहिल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये उदयसिंह पाटील यांना तज्ञ संचालक म्हणून यावेळी घेतले जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले.