इंदापूर: इंदापूर तालुक्यातील डाळज येथे शेतमजूर कुटुंबाच्या शेळ्यांबरोबर कोंबड्यांवरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे . या चोरीत तीस हजार रुपये किंमतीच्या शेळया व बोकड तसेच दोन हजार रुपयांच्या कोंबड्या असा एकुण बत्तीस हजार रुपये किंमतीचा माल चोरट्यांनी हातोहात लांबवला आहे. शनिवार रात्रीच्या सुमारास ही चोरी झाल्याची फिर्याद हनुमंत सदाशिव शिंदे रा.डाळज नं. ३ यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे. भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाळज नंबर तीन येथील शिंदे वस्तीवर हा चोरीचा प्रकार घडला .
मागील काळातही इंदापूर तालुक्यातील इंदापूर, भिगवण,वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वारंवार शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या शेळ्या चोरीला जाण्याचे प्रकार घडत होते. काही दिवस या चोऱ्या बंद झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा शेळी चोरण्याचे चोरट्यांनी सत्र सुरू केले असून, शेळ्यां बरोबर आता कोंबड्यांचीही चोरी होऊ लागल्याने शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी महिला धास्तावलेल्या आहेत. इंदापूर, भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी घडलेल्या शेळी चोरीच्या अनेक गुन्ह्यांचे तपास अद्यापही प्रलंबित असून गायब झालेल्या शेळ्या व चोर अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
उपजिविकेसाठी शेती व शेतमजुरी करीत असताना अनेक कुटुंबे चरितार्थाला आधार म्हणून छोट्या- मोठ्या प्रमाणामध्ये घरगुती शेळ्या पालन करणे, गावरान कुकुटपालन करणे, आधी छोटे व्यवसाय करीत असतात .बहुतांशी अशा व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग मोठा असतो. चार पैसे आणि वेळप्रसंगी आपल्या हाती असावेत म्हणून रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी कुटुंबातल्या व शेतमजूर महिला दिवसभर शेतात काम करून येताना शेळ्यांना शेत शिवारात फिरून गवतकाडी, पालापाचोळा गोळा करून आणीत असतात. त्याशिवाय दिवसभर उन्हातान्हात फिरून शेळ्यांची राखण करीत असतात. त्याचबरोबर गावरान कोंबडी पालन करणे असे व्यवसाय करून चरितार्थाला हातभार लावतात.
हेही वाचा
मात्र, आता चोरट्यांनी अशा कष्टकरी महिलांच्या शेळ्या व कोंबड्या लांबवण्याचे प्रकार सुरू केल्यामुळे परिसरामध्ये या चोरांचीच मोठी दहशत पसरली आहे. आता शेळ्या बरोबर त्यांनी कोंबड्याही चोरायला सुरुवात केल्यामुळे ग्रामीण भागातील महिला अक्षरशः हतबल झाल्या आहेत. शेतमजूर ,शेतकऱ्यांच्या घराच्या अंगणामध्ये थोडाफार आडोसा करून निवाऱ्याला शेळ्या बांधलेल्या असतात. काही शेतकरी काटेरी कुंपणही करतात. कोणी तारेचे ही कुंपण करतात.तरीसुद्धा हे चोरटे कुंपण तोडून शेळ्या लांबवतात.
काल डाळज येथे झालेल्या चोरीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता. सदर शेळ्या व बोकड एका बंदिस्त खोलीमध्ये बांधण्यात आले होते. त्याला कुलूप ही लावली होते. मात्र कटावणीने कुलूप तोडून चोरट्यांनी शेळ्या तर लांबवल्याच परंतु बरोबर जाताना कोंबड्याचा खुराडाही त्यांनी उचलून नेला. शेजारील डी.एन .जगताप यांच्या शेतातील मकेच्या पीकात मोकळा खुराणा सोडून त्यातील कोंबड्या त्यांनी चोरुन नेल्या आहेत .
सकाळी उठून सदर कुटुंबाने पाहिले असता , शेळ्या बरोबरच कोंबड्याही खुराड्यासह गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आजूबाजूला त्यांनी चौकशी केली. मात्र कुठेही मागमूस लागला नाही. अनेक महिला शेतकऱ्यांना शेतमजुरांना दहा ते पंधरा हजार रुपये किंमतीची शेळी विकत घेणे परवडत नसल्याने, ज्यांना शेळी सांभाळणे शक्य होत नाही. अशा लोकांकडून ते शेळी अर्ध्या वाट्याने घेत असतात. त्यातील निम्मे उत्पन्न मूळ मालकाला देऊन स्वतःकडे अर्धे उत्पन्न ठेवले जाते. अशा पद्धतीनेही शेळी पालन होत असते .त्यातून चरित्रासाठी कुटुंबाला थोडाफार हातभार लागतो. परंतु शेळ्या व कोंबड्याच्याच चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने, ग्रामीण भागामध्ये असे व्यवसाय करून चरितार्थ चालवणारी कुटुंबं, व कष्टकरी माय – भगिनी हतबल झाल्या आहेत.