इंदापूर : पिढ्या न पिढ्या काबाडकष्टाने खचलेला, पिचलेला महाराष्ट्रातील मराठा समाज लेकराबाळांच्या भवितव्याच्या चिंतेपोटी आरक्षणासाठी एकत्र आला आहे. मराठ्यांचे हे आंदोलन रोखण्याची कोणामध्येही धमक राहिलेली नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाने सरकार जेरीस आलेले आहे. उग्र आंदोलनाला माझे समर्थन नाही. त्यामुळे जाळपोळ, उद्रेक करू नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी शनिवारी इंदापूर येथे मराठा आरक्षण आंदोलन सभेत केले. आत्महत्या केल्या तर, आरक्षण द्यायचे कोणाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : सत्ताधाऱ्यांमध्ये सौंदर्यदृष्टीचा अभाव, राज ठाकरे यांची टीका
हेही वाचा : पुणे: गुन्हेगार मित्राला जामीन मिळवून देण्यासाठी त्याने केले साखळीचोरीचे गुन्हे
जरांगे म्हणाले की, ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांचे बांधव आहेत. ओबीसींचे आम्ही आरक्षण घेणारच नाही. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये विदर्भ, कोकण, नाशिक पट्टा, नगर भागातील सुमारे सत्तर टक्के मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण आहे. आता केवळ उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाडा एवढाच प्रश्न बाकी आहे. आरक्षण कायमस्वरूपी टिकण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीने आपले काम दाखवून तातडीने आम्हाला आरक्षण मिळवून द्यावे. अन्यथा यापुढेही आंदोलनाचा लढा असाच सुरू ठेवण्यात येईल. आंदोलनाची दिशा रविवारी (२२ ऑक्टोबर) ठरवण्यात येईल. मराठा समाज अडचणीमध्ये आहे. आरक्षणासाठी, न्याय हक्क मागण्यासाठी मराठ्यांची आता लाट आली आहे. ऊन, वारा, पाऊस आता बघायचा नाही. न्याय दिल्याशिवाय आता मागे हटायचं नाही. आजपर्यंत झालं ते झालं. मराठा समाजाने आता तरी भानावर यावे, असे आवाहनही जरांगे यांनी या वेळी केले.