इंदापूर : कुणबी दाखले तपासण्याची मराठवाड्यापुरती मागणी महाराष्ट्रभर करण्यात आली. आता सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी होत असून ते दिलेही जात आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत दिलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, काकडे, जाचक यांना विचारा कुणबी दाखला हवा? आणि नको असल्यास पुढे येऊन सांगा. निवडणुकीत मते मिळणार नाहीत म्हणून मोठे नेतही बोलत नाहीत. सरसकट कुणबी दाखले दिल्यास मराठा शिल्लकच राहणार नाही, याबाबत मराठा विचारवंतांनी पुढे यावे. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करताना त्यांच्याकडे २० टक्के, तर आमच्याकडे ८० टक्के मते आहेत, असा इशाराही भुजबळ यांनी या वेळी दिला.
हेही वाचा : पिंपरी : तळवडे दुर्घटनेतील आणखी दोघांचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या ८, तर इतर ८ जणांची प्रकृती चिंताजनक
इंदापूर येथे ओबीसी भटके विमुक्त समाजाच्या मेळाव्यात मंत्री भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, ‘जातीय जनगणना झाली पाहिजे, म्हणजे कोण कुठे आहे?, ते सर्वांना कळेल. आजपर्यंत ओबीसींच्या रिक्त राहिलेल्या जागांचा अनुशेष भरला पाहिजे. गावागावात बंदीचे फलक अजूनही तसेच आहेत. मात्र, रोहित पवारांच्या यात्रेचे गावागावांत स्वागत कसे होते?, याबाबत प्रश्न विचारणाऱ्यांवर हल्ले होत आहेत. बहिष्कार घातला जात आहे. मी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करुन गेल्यानंतर शुद्राच्या येण्याने रस्ता अशुद्ध झाला म्हणून तो रस्ता गोमूत्राने धुतला गेला. आम्ही शूद्र आहोत. आम्हाला शूद्रच राहू द्या, तुम्ही उंचीवर रहा. आम्ही शुद्र आहोत, तर आमचे आरक्षण का मागता?