इंदापूर: इंदापूर तालुक्यातील न्हावी गावाच्या हद्दीमध्ये वालचंदनगर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अफूची शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये छापा टाकून मोठ्या प्रमाणात अफूची बोंडे जप्त करुन कारवाई केली. या बोंडाचे मोजमाप व गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

इंदापूर तालुक्यातील न्हावी गावाच्या परिसरामध्ये अफूची शेती केली जात असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांनी मिळाल्यानंतर वालचंदनगर पोलिस व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी आज भल्या सकाळी छापा टाकला. यावेळी न्हावी परीसरातील काही शेतकरी आडबाजुला शेतामध्ये मकेच्या पिकाच्या आधाराने अफूची शेती करीत असल्याची आढळले.

आज दिवसभर पोलिसांचा मोठा फौजफाटा न्हावी गावाच्या परिसरामध्ये दाखल झाला होता. न्हावी गावाला पोलीस छावणीचे रूप आले होते. शेती शिवारांमध्ये अफूची शेती शोधत,आज दिवसभर पोलिस अफूच्या शेतीच्या मालंकावर कारवाई करीत होते. पोलिसांनी अफूची बोंडे व झाडे जप्त केली आहेत. रात्री उशीरापर्यत अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर,पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्यासह मोठा पोलिसांचा फौजफाटा या कारवाईत सहभागी झाला होता.

मागील काळातही इंदापूर तालुक्यातील अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली होती.

Story img Loader