पुणे : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२३-२४ मध्ये कांदा उत्पादनात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४७.३५ लाख टनांनी घट होऊन २५४.७३ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कांदा निर्यातीवरील निर्बंध उठण्याची शक्यता धूसर झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२३-२४ या वर्षासाठी फलोत्पादनाचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा देशात सुमारे २५४.७३ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे.
सन २०२२-२३मध्ये देशात ३०२.०८ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात ३४.३१ लाख टन, कर्नाटकात ९.९५ लाख टन आणि आंध्र प्रदेशात ३.५४ लाख टन आणि राजस्थानात ३.१२ लाख टनांनी उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत कांदा उत्पादनात यंदा ४७.३५ लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. टोमॅटो उत्पादनात गेल्या वर्षाच्या तुलनेत १.९३ टक्क्यांनी वाढ होऊन एकूण उत्पादन २०८.१९ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षा २०४.२५ लाख टन टोमॅटो उत्पादन झाले होते.
हेही वाचा : पिंपरी : बारणे-वाघेरेंमध्ये ‘गद्दारी’वरून आरोप-प्रत्यारोप
बटाटा उत्पादनातही घट
देशात यंदा ५८९.९४ लाख टन बटाटा उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या वर्षी ६०१.४२ लाख टन बटाटा उत्पादन झाले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ११.४८ लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. कांदा, टोमॅटो आणि बटाटा, ही मुख्य भाजीपाला उत्पादने आहेत. सर्वसामान्यांच्या आहारातील मुख्य घटक असल्यामुळे पुरेशी उपलब्धता आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार या पिकांच्या उत्पादनावर लक्ष ठेवून असते.
हेही वाचा : पिंपरी : चिंचवडमध्ये भाजपच्या जाहिरातीला काळे फासले
फलोत्पादन ३५५२ लाख टनांवर
यंदा देशात एकूण फलोत्पादन (पालेभाज्या, फळभाज्या आणि फळे) ३५५२.५ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी भाजीपाला लागवड २८४.४ लाख हेक्टरवर होऊन ३५५४.८ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा २८७.७ लाख हेक्टरवर लागवड होऊन ३५५२.५ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. भाजीपाल्यामध्ये पत्ताकोबी, फूलकोबी, साबुदाणा, लाल भोपळा, टोमॅटोसह अन्य भाजीपाल्याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. केळी, मोसंबी आणि आंब्याच्या उत्पादनात वाढ होऊन एकूण फळ उत्पादन ११२०.८ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट गावांसाठीची आर्थिक तरतूद राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायद्याची?
एकरी उत्पादनात लक्षणीय वाढ
पीकवर्ष २०२३-२४ मधील (जुलै-जून) फलोत्पादनाच्या पहिल्या अंदाजात कांदा पिकाखालील क्षेत्र व उत्पादकता गृहीत धरली आहे. त्यात पुढील अनुमानात वाढ होऊ शकते. रब्बीत महाराष्ट्रात क्षेत्र कमी असले, तरी एकरी कांदा उत्पादकता यंदा लक्षणीयरीत्या सुधारली आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनात रब्बीचा वाटा ७० टक्क्यांहून अधिक आहे, तर महाराष्ट्राचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत येतो. रब्बी कांद्याची काढणी अद्याप बाकी असल्यामुळे मे अखेरीस कांदा उत्पादनाची स्थिती अधिक स्पष्ट होईल, असे मत शेती अभ्यासक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.