पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी, तसेच ससूनमधील डॉक्टरांसह सात आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठीचा मसुदा पुणे पोलिसांनी शुक्रवारी दाखल केला. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात हा मसुदा पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दाखल केला. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डाॅ. तावरे, डाॅ. हाळनोर, घटकांबळे हे शासकीय कर्मचारी असल्याने, त्यांच्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यास परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम १९७ प्रमाणे राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. राज्य शासनाने आरोपींविरोधात फौजदारी खटला चालविण्यास मंजुरी दिली.

हे ही वाचा… हर्षवर्धन पाटील हे दलबदलू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांंची टीका

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात अगरवालच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मुलाला वाचविण्यासाठी अगरवाल दाम्पत्याने ससूनमधील डाॅ. तावरे, हाळनोर यांना पैसे दिले. मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केले. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, त्याची पत्नी शिवानी यांच्यासह ससून रुग्णालयाचे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

मोबाइलचा ‘पॅटर्न’देण्यासाठी अर्ज

डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांचे मोबाइल संच तांत्रिक विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. या मोबाइलला ‘पॅटर्न’ लॉक असल्याने ते उघडण्यात अडचणी येत आहेत. या दोघांचे मोबाइल संच उघडण्यासाठी (अनलॉक) करण्यासाठी त्याचा ‘पॅटर्न’ मिळावा, यासाठी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे आणि सहायक ॲड. सारथी पानसरे यांनी न्यायालयात अर्ज सादर केला आहे.

हे ही वाचा… पीएमआरडीएच्या घरांना प्रतिसाद; सदनिकेसाठी १ हजार ९३२ नागरिकांची नोंदणी

अरुणकुमार सिंगला फरार घोषित करण्याची मागणी

अपघाताच्या वेळी अल्पवयीन मुलासोबत असलेल्या मित्राचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अरुणकुमार सिंग याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील मुलाला वाचविण्यासाठी सिंग याच्या सांगण्यावरुन मित्र आशिष मित्तलने स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला आहे. शिवाजीनगर न्यायालय, तसेच मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. सिंगला फरार घोषित करण्याचा अर्ज सरकारी वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात सादर केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kalyani nagar porsche accident case trial likely to begin soon pune print news asj