पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सात कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर कसब्यात मनसेला खिंडार पडले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास मनसैनिकांनी राजीनामा दिला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. मात्र मनसेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांची हकालपट्टी करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे कसब्यात मनसेला खिंडार पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारफेरीमध्ये कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांवरती नजर ठेवून असलेल्या काही व्यक्तींनी राज ठाकरेंना माहिती पुरविली आणि रवींद्र खेडेकर आणि प्रकाश ढमढेरे यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांना बडतर्फ केले. त्यामुळेच पन्नास मनसैनिकांनी राजीनामा दिला असून, रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.