पुणे : पश्चिम घाट परिसरातील कोल्हापूरनजीकच्या पट्टणकोडोली परिसरात विंचवाची नवीन प्रजाती शोधण्यात आली आहे. प्रदेशनिष्ठ असलेल्या या प्रजातीच्या रचनाशास्त्र आणि जनुकीय संचाच्या सखोल अभ्यासातून ही प्रजाती इतर प्रजातींहून वेगळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. ओमकार यादव, सौरभ कीनिंगे, दहिवडी महाविद्यालयातील डॉ. अमृत भोसले, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे देवेंद्र भोसले, कोल्हापुरातील आशुतोष सूर्यवंशी, सांगोला महेश बंडगर आणि क्रांती बंडगर यांचा या संशोधनात सहभाग होता. या संशोधनाचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. नव्याने शोधलेल्या प्रजातीचा समावेश ‘आयसोमेट्रस’ या कुळात करण्यात आला आहे. या कुळातील विंचू मुख्यत्वे झाडांच्या खोडांवर वावरतात. पट्टणकोडोली परिसरातील नारळाच्या झाडांवर ही प्रजाती महेश बंडगर, आशुतोष सूर्यवंशी आणि देवेंद्र भोसले यांना आढळली. त्यानंतर डॉ. ओमकार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रजातीच्या रचनाशास्त्राचा आणि जनुकीय संचाचा सखोल अभ्यास केला असता ही प्रजाती कुळातील इतर प्रजातींहून वेगळी असल्याचे सिद्ध झाले. आकार, पृष्ठभागावरील आणि शेपटीरावरील वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचना, पेक्टिनल टीथची संख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संचामुळे ही प्रजाती कुळातील इतर प्रजातींपासून वेगळी ठरते.

आयसोमेट्रस कुळातील विंचू त्यांच्या झाडांच्या खोडांवरील वावरासाठी ओळखले जातात. ही प्रजाती शेताच्या बांधावरील झाडांवर आढळली. या विंचवांचा रंग झाडांच्या खोडांशी मिळताजुळता असल्याने ते सहज दिसत नाहीत. निशाचर असलेले हे विंचू दिवसा झाडांच्या सालींखाली विश्रांती घेतात, असे डॉ. यादव यांनी सांगितले. नव्याने शोधलेली प्रजाती प्रदेशनिष्ठ असल्याने या प्रजातीचे, त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. अनेक विकासकामांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे या प्रजातीला धोका निर्माण होऊ शकतो, असे देवेंद्र भोसले यांनी सांगितले.

प्रजातीला डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव

डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे नव्या प्रजातीला डॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. आयसोमेट्रस ज्ञानदेवाय असे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे, असे डॉ. यादव यांनी सांगितले.

Story img Loader