पुणे : अवकाळी पाऊस, धुके, ढगाळ हवामानाचा फटका बसल्यामुळे कोकणातील काजूचे उत्पादन जेमतेम ४० टक्क्यांवर आले आहे. एकीकडे उत्पादनात दुष्काळ असताना दुसरीकडे कवडीमोल दरामुळे काजूउत्पादकांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात कोकणाला अवकाळी पाऊस, धुके आणि ढगाळ हवामानाचा फटका बसला. त्यामुळे काजूच्या झाडांना पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर जळून गेला. सध्या उत्पादित होत असलेले काजू दुसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोरापासून मिळत आहेत. सरासरीच्या जेमतेम ४० टक्के काजूचे उत्पादन मिळत आहे.
दापोली कृषी विद्यापीठाने काजू बीला प्रतिकिलो १५० रुपये दर निश्चित केला आहे. प्रत्यक्षात सिंधुदुर्गसह परिसरातील काजूउत्पादकांना काजू बीला प्रतिकिलो १०० ते ११० रुपये प्रतिकिलो दर मिळतो आहे. उत्पादन खर्चही भरून न निघणाऱ्या कवडीमोल दरामुळे शेतकरी हताश झाले आहेत. गोवा सरकारने काजू बीखरेदीचा दर प्रतिकिलो १५० रुपये निश्चित केला असताना आम्हाला काजू १०० ते ११० रुपये दराने विकावे लागत आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग शेतकरी व फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत आणि कुडाळ येथील काजूउत्पादक नितीन गोलटकर यांनी दिली.
हेही वाचा : पुण्यात वाढल्या उन्हाच्या झळा
काजू बोर्ड, अनुदान कागदावरच
मागील वर्षी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांच्या काजू बोर्डाची घोषणा केली. आजअखेर काजू बोर्डाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. काजू बोर्ड केवळ कागदावरच राहिले आहे. आता सरकारने काजू उत्पादकांसाठी प्रतिकिलो १० रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. पण, अनुदान मिळण्यासाठीचे निकष पाहता, एकूण शेतकऱ्यांपैकी केवळ १० ते १२ टक्के शेतकऱ्यांनाच ते मिळू शकते. भौगोलिक मानांकन मिळालेला वेंगुर्ला काजूही कवडीमोल दराने विकावा लागत आहे. असेच नुकसान होत राहिल्यास शेतकरी आत्महत्येचे लोण कोकणात येण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती सिंधुदुर्ग शेतकरी व फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सांवत यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : मावळात बालिकेवर अत्याचार करुन खून करणाऱ्या आरोपीला फाशी, आरोपीच्या आईला सात वर्ष सक्तमजुरी
उत्पादनात झाली मोठी घट
मोहोर येण्याच्या काळात अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान आणि धुके पडल्यामुळे काजूचा मोहोर जळून गेला. काजूच्या अनेक बागा पूर्णपणे वाया गेल्या आहेत. सरासरी ४० टक्क्यांपर्यंत काजू बीचे उत्पादन मिळत आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे, अशी माहिती वेंगुर्ला तालुका कृषी विभागाचे तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोलम यांनी दिली.