पुणे : कचरावेचक महिलेला मारहाण करुन तिच्या अंगावर पाळीव श्वान सोडण्यात आले. पाळीव श्वानाने चाव घेतल्याने महिला जखमी झाली असून या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी एका महिलेसह तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत लक्ष्मी गायकवाड (वय ६५, रा. जयभवानीनगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सुप्रिया संजय कांबळे (वय २३, रा. कोथरुड), हिच्यासह तिचा भाऊ आणि वडिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी गायकवाड कचरावेचक आहेत. कांबळे हिच्या घरातील कचरा गायकवाड यांनी उचलला नाही. त्यामुळे सुप्रियाने जाब विचारला. तुम्ही कचरा का उचलला नाही, असे तिने विचारले. तेव्हा तीन महिने कचरा उचलण्याचे पैसे दिले नाही, असे गायकवाड यांनी तिला सांगितले. या कारणावरुन सुप्रियाने गायकवाड यांच्याशी वाद घातला.

तिने दांडक्याने गायकवाड यांना मारहाण केली. घरातील पाळीव श्वान गायकवाड यांच्या अंगावर सोडले. श्वानाने गायकवाड यांचा चावा घेतला. सुप्रियाच्या वडिलांनी मारहाण केल्याचे गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, असे कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.