लोणावळा: गुजरातमधून लोणावळा- खंडाळा फिरायला आलेल्या पर्यटकाने कहर केला. २० जणांचा ग्रुप लोणावळा आणि खंडाळा परिसरात फिरण्यासाठी आला होता. ते सर्व जण राजमाची पॉईंट परिसरात फिरण्यास गेले. ग्रुपमधील एकाचे मित्रांसोबत किरकोळ वाद झाले. ‘त्या’ पठ्ठ्याने दारूच्या नशेत २०० फूट उंच डोंगरावरून थेट पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग गाठला. केवळ नशीब बलवत्तर असल्याने तो सुखरूप खाली उतरू शकला अशी माहिती शिवदुर्ग रेस्क्यू टीमने दिली आहे.
हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: मेळावा ‘शिवस्वराज्य’ यात्रेचा; चर्चा अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याची
झालं असं की, ग्रुप मधील काही जण मद्यधुंद अवस्थेत होते. पैकी, एकाचे त्यांच्यात किरकोळ वाद झाले. तो तरुण रागाच्या भरात पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील २०० फूट उंच डोंगरावरून जीव धोक्यात घालून थेट खाली उतरला. ‘त्या’ तरुणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच तिथं शिवदुर्ग लोणावळा रेस्क्यू टीम पोहचली. त्याचा शोध घेण्यात आला. पण, तो दरड कोसळू नये यासाठी लावण्यात आलेल्या जाळीवरून खाली उतरल्याचं शिवदुर्ग रेस्क्यू टीमने सांगितलं. रेस्क्यू टीम त्या तरुणाची भेट घेतली. तो दारूच्या नशेत होता आणि मित्रांसोबत वाद झाल्याने तो डोंगरावरून खाली उतरल्याचं सांगितलं. परंतु, अशा पद्धतीने खाली उतरणे तरुणाच्या जीवावर बेतू शकलं असतं. ही सर्व घटना गुरुवारी दुपारी घडलेली आहे. लोणावळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी पर्यटकांना सुरक्षित पर्यटन करण्याचे आवाहन केलं आहे. स्वतः ची आणि कुटुंबाची काळजी घेऊन पर्यटन करा. इतरांना त्रास होणार नाही याचीही काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी पर्यटकांना केलं आहे.