लोणावळा : काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे या भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला अखेर प्रणिती शिंदे यांनीच पूर्णविराम दिला आहे. माझी तत्व आणि विचार हे काँग्रेसचे आहेत. त्यामुळे मरेपर्यंत मी काँग्रेस सोडणार नाही. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. पक्षातून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना परत आणण्याची क्षमता काँग्रेसमध्ये आहे. उलट आम्ही भाजपला संपवू असं म्हणत त्यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चेच खंडन करत टीका केली. प्रणिती शिंदे या लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. काँग्रेसच्या राष्ट्रीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे.
काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे म्हणाल्या, काँग्रेस जिथे जिथे लढेल तिथं आम्ही जिंकणार. भाजपच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. भाजप इतर नेत्यांवर दबाव टाकत आहे. या सर्व गोष्टींना नागरिक कंटाळले आहेत. त्यांना आता सक्षम पर्याय हवा आहे. त्या पुढे म्हणाल्या. भाजपच्या वाटेवर कोणीही नाही. जे गेले त्यांना काही पर्याय नव्हता. भाजप त्यांना मानसिकरित्या त्रास देत होते. नांदेडचे अनेक लोक आमच्यासोबत आहेत. तीच खरी काँग्रेस आहे.
हेही वाचा : वांद्रे आणि गेट वे जवळ स्फोट होणार; पुण्यातील नियंत्रण कक्षाला दूरध्वनी
पुढे त्या म्हणाल्या, किती आले- गेले तरीही काँग्रेस मजबूत आहे. या शिबिरात सर्व आमदार, काँग्रेस पदाधिकारी आले आहेत. कोणी कुठे जाणार नाही. कुणावर तेवढा ईडी चा दबाव नाही. सोलापूर लोकसभा लढवणार का? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, काँग्रेस पक्ष लोकसभेची तयारी करीत आहे. कोण कुठे लढणार हे अद्याप ठरलेलं नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. शंभर टक्के आमच्या रक्तात काँग्रेस आहे. जे पक्षातून गेले आहेत त्यांना परत आणण्याची आमच्यात क्षमता आहे. मरेपर्यंत मी काँग्रेसमध्ये असेल. माझे तत्व भाजप सोबत तडजोड करू शकत नाही. मी काँग्रेस सोबतच काम करणार तो विचार सगळीकडे पसरवणार आणि भाजपला आम्ही संपवू. असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.