पुणे: लोणावळ्यातील धबधब्यात पाच जणांचा वाहून जाऊन मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर भुशी धरण परिसरातील अनधिकृत अतिक्रमण हटवले आहेत. यावरून मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके हे आक्रमक झाले आहेत. भुशी धरण परिसरातील नागरिकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असून आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका. अन्यथा तुम्हाला अडचण होईल. हे सरकार कुणाच आहे?, हे गेलं फाट्यावर. एक दिवस लोणावळा आणि महामार्ग बंद केला तर सगळ्यांची पळता भुई होईल असा इशारा सत्ताधारी आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनाला दिला आहे. सुनील शेळके यांनी आज स्टॉल धारक आणि टपरी धारक व्यावसायिक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.
सुनील शेळके म्हणाले, काल मी या माणसाला (अधिकारी) फोन केला होता. हा जाहागीरदार फोन उचलत नव्हता. हिशोब चुकता करणार आहे, हे लक्षात ठेव. पुढे ते म्हणाले, दोन दिवस मुदत द्या, शनिवारी तहसीलदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यायचं मार्किंग करून द्यायची. भिंतीला लागून असलेले बांधकाम काढायचं. जे अतिक्रमण हटवलं आहे. त्यांचं जे नुकसान झालं आहे. ते सर्व तुम्ही नुकसान भरपाई द्यायची. असे अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. दोन- तीन दिवसांत टपरी धारकांना जागा निश्चित करून द्या. नागरिकांच्या रोजीरोटीची कदर यांना राहिली नाही. भुशी डॅम आलेलं पर्यटनाचं पर्यटन स्थळ हे प्रशासन बंद करायला निघालं आहे. व्यवसायिकांनी घाबरू नये. मला जेवढी मदत करता येईल ती मी करेल. स्टॉल उभे करायचे सिमेंट, पत्रे लागत असतील तेवढं मटेरिअल देतो. पाण्याच्या प्रवाहात भुट्टे स्टाॅल उभा करू नका. असं ही आवाहन त्यांनी केलं आहे.
हेही वाचा : पिंपरी पोलिसांकडून आणखी दोन टोळ्यांवर ‘मोक्का’, आतापर्यंत ९८ गुन्हेगारांवर कारवाई
पुढे ते म्हणाले, भुशी डॅमच्या खालील जागा ही खासगी आहे. दुकानदार, स्थानिकांच्या बापाच्या जागा आहेत. वर्षातील सहा महिने व्यवसाय करतात. लोणावळा येथील नागरिकांचा पर्यटन हा व्यवसाय असेल तर त्याला गालबोट लागू देऊ नका. यांचं अस्तित्व कुठल्याही अधिकाऱ्याने अडचणीत आणू नये. “सरकार कुणाचं आहे?, हे गेलं फाट्यावर, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला अडचण होईल. एक दिवस लोणावळा आणि महामार्ग बंद केला तर सगळ्यांची पळतीभुई होईल.”, या मार्गाने आम्हाला जायला लावू देऊ नका. असे शेळके म्हणाले आहेत.