लोणावळा : लोणावळ्यात विकेंड आणि नाताळ सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. टायगर आणि लायन्स पॉईंट या ठिकाणी देखील शेकडो पर्यटकांची गर्दी झाली आहे. पण, जीवावर बेतणारे पर्यटन पर्यटक करत असल्याचं लोकसत्ता ऑनलाइन प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. लायन्स पॉईंट येथे खोल दरी असून संरक्षण जाळ्यावर बसून आणि उभे राहून पर्यटक फोटोसाठी पोज देत आहेत. ८०० ते १ हजार फूट खोल दरी आहे. तिथेच पर्यटकांचे जीवावर बेतणारे फोटोसेशन सुरू आहे.
लोणावळ्यात नाताळ सण साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातुन हजारो पर्यटक दाखल होत आहेत. लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाली आहे. विकेंड आणि नाताळची सुट्टी सलग आल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. याच कारणाने पुणे- मुंबई द्रुतगती मार्गदेखील ठप्प झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, पर्यटक हे लायन्स पॉईंट आणि टायगर्स पॉईंट येथे निसर्गाच अनोखं सौंदर्य बघण्यासाठी गर्दी करत आहेत. सहकुटुंब आलेले पर्यटक स्वतःची काळजी घेताना दिसत आहेत. मात्र, मित्र, मैत्रिणीसह आलेले तरुण आणि तरुणी जीवावर बेतणारे पर्यटन करत आहेत.
हेही वाचा : “…तर त्या दिवशी सर्व खासदारांचा कार्यक्रमच झाला असता”, सुप्रिया सुळेंचं विधान
लायन्स पॉईंट इथे १ हजार फूट खोल दरी असून सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या जाळ्यावर पर्यटक उभे राहून आणि बसून पोज देत फोटोसेशन करत आहेत. अशा ठिकाणी लोणावळा शहर पोलीस दिसत नाहीत. आधीच लोणावळ्यातील वाहतूक कोंडीमुळे पोलीस मेटाकुटीला आलेले आहेत. अशात आता पर्यटक अशा पद्धतीने बेजबाबदार वागताना दिसत आहेत.