पुणे : राज्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या गाळप हंगामात २०७ कारखाने सुरू झाले होते, त्यांपैकी १७८ कारखान्यांनी गाळप पूर्ण करून धुराडी बंद केली आहेत. सोमवारी, आठ एप्रिलअखेर राज्यात १०८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे अंदाजापेक्षा १८ लाख टनांनी जास्त आहे.
यंदाच्या गळीत हंगामात राज्यात १०३ सहकारी आणि १०४ खासगी, अशा एकूण २०७ साखर कारखान्यांनी आपला हंगाम सुरू केला होता. आठ एप्रिलअखेर राज्यातील १७८ कारखान्यांनी आपले गाळप पूर्ण करून कारखाने बंद केले आहेत. हंगामात दैनंदिन सरासरी नऊ लाख टनांनी गाळप करून आजअखेर १०५९ लाख टन उसाचे गाळप पूर्ण करून १०८ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. मागील वर्षी सरासरी साखर उतारा १० टक्के होता. यंदा त्यात वाढ होऊन १०.२४ टक्क्यांवर गेला आहे.
हेही वाचा : तूरडाळीची भाववाढ? तुरीचे दर बारा हजार रुपये प्रति क्विंटलवर
उकाड्यामुळे ऊसतोडणी रखडली
कोल्हापूर विभागातील ४० पैकी ३९, पुणे विभागातील ३१ पैकी २६, सोलापूर विभागातील ५० पैकी ४५, नगरमधील २७ पैकी १८, छत्रपती संभाजीनगरमधील २२ पैकी १९, नांदेड विभागातील २९ पैकी २५, अमरावती विभागातील ४ पैकी ४, नागपूर विभागातील ४ पैकी २ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. अद्याप २९ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. पण वाढत्या उन्हाच्या झळांमुळे ऊसतोडणी मजूर काम सोडून जात आहेत. मजुरांना जास्त पैसे देऊन थांबवून ठेवावे लागत आहे. जे मजूर ऊसतोडणी करीत आहेत. त्यांनाही उन्हांच्या झळांमध्ये ऊसतोडणी करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे कारखाने यंत्रांद्वारे ऊसतोडणीला प्राधान्य देत आहेत.
हेही वाचा : उकाड्यापासून दिलासा…आजपासून तीन दिवस पाऊस
महिनाअखेर चालणार हंगाम
हंगामाच्या सुरुवातीस राज्यात ९० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात १०८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने अद्याप सुरू आहेत. पंधरा एप्रिलपर्यंत हंगाम संपेल, त्यानंतर तीन-चार कारखाने महिनाअखेरपर्यंत चालतील. राज्यात हंगामअखेर ११० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.