पुणे : राज्यात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या १५ पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात तीन संरचित आहार पद्धतीनुसार व्हेजिटेबल पुलाव, नाचणी सत्व, अंडा पुलाव, तांदळाची खिचडी अशा पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्याच त्या खिचडीला स्वादिष्ट पर्याय उपलब्ध झाला आहे.

शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. तसेच योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो. सद्यस्थितीत तांदूळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहार दिला जात आहे. केंद्र शासनाने दिलेल्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये स्थानिक पातळीवर उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी वृध्दिंगत करणे, आहारात वैविध्य आणण्यासाठी पाककृती सुधारणा समिती नियुक्त करण्यात आली होती. राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये निर्माण केल्या जात असलेल्या परसबागांतून उत्पादित भाजीपाला, फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार मिळण्यास मदत होत आहे.

हेही वाचा : या मराठी संशोधकाने ६० वर्षांपूर्वी उपस्थित केला होता विश्वनिर्मितीच्या ‘बिग बँग’ सिद्धान्तावर प्रश्न…

या पार्श्वभूमीवर आहारात वैविध्यता आणून तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर, नाचणी सत्व यांचा समावेश असलेला तीन संरचित आहार (थ्री कोर्स मील) देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार निश्चित केलेल्या पाककृतींमध्ये व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मसाले भात, मोड आलेल्या मटकीची उसळ, मटार पुलाव, गोड खिचडी मुगडाळ खिचडी चवळी खिचडी, मुग शेवगा वरण भात, तांदळाची खीर, चणा पुलाव, नाचणीचे सत्व, सोयाबीन पुलाव, मोड आलेले कडधान्य या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : पुणे शहरातील नाल्यांची सफाई आठ दिवसात न झाल्यास तीव्र आंदोलन करणार : सुप्रिया सुळे

अंमलबजावणी कशी?

निश्चित केलेल्या पाककृती दरदिवशी एक या प्रमाणे बारा दिवस द्यायच्या आहेत. तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्हातील स्थानिक परिस्थिती, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गरजेनुरुप पाककृती निश्चित करताना तांदूळ, कडधान्य डाळ यांचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे. संबंधित जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या तांदूळाच्या प्रमाणानुसार कडधान्य, डाळ, तेल, मीठ, मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला निश्चित करावा. व तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणेच पोषण आहार देणे अनिवार्य आहे. पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदूळापासून तांदळाची खीर, शिल्लक राहणारा भाजीपाला आणि मोड आलेली कडधान्यांची कोशिंबीर हे पदार्थ दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविध्यता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना दररोड आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊट्स) द्यावीत. आठवड्यातील चार दिवस दररोज तांदळाची खीर, एक दिवस नाचणी सत्व नियमित पाककृतीसोबत द्यावी. अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हेजिटेबल पुलाव द्यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ द्यावे. त्या दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्व, मोड असलेले कडधान्य (स्प्राऊट्स) देण्यात येऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे.