पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी शुल्कात वाढ करण्यात आल्याने सामान्य प्रवाशांचा प्रवास महागला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांतील अपघातांची सख्या पाहता प्रवासी असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागांतर्गत मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ पर्यंत तब्बल ३०१ अपघात झाले असून, ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षांच्या तुलनेत गंभीर अपघातांमध्ये वाढ झाली असून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याचे समोर आले आहे.
एसटी महामंडळाकडून २५ जानेवारीपासून प्रवासी शुल्कात १४.९५ टक्क्यांनी वाढ लागू केली आहे. मात्र सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत हमी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. आयुर्मान संपलेल्या बस ग्रामीण भागात चालविल्या जात आहेत. त्यामुळे द्रुतगती महामार्ग, राज्य मार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ या २१ महिन्यांमध्ये पुणे विभागांतील बसचे ३०१ अपघात झाले आहेत. यामध्ये १५० अपघात गंभीर, तर १२६ अपघात किरकोळ आहेत.
गंभीर अपघातांचे प्रमाण अधिक असून ३५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. गंभीर अपघातांमध्ये देखील वाढ झाली असून २०२३ अखेरपर्यंत १७ मृत्यू झाले. २०२४ मध्ये गंभीर अपघातांमध्ये वाढ होऊन १८ जण मरण पावल्याचे एसटी महामंडळाच्या आकेडवारीवरून स्पष्ट झाले आहे.
बसच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चालकांची आरोग्य तपासणी, शिबिर आणि वेळोवेळी कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. अपघात झाल्यानंतर संबंधित चालकांना नव्याने आठ ते दहा दिवस प्रशिक्षण देऊन चाचणी घेतली जाते. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहक आणि चालकांना सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरच जुन्या बस सेवेतून काढून नवीन पर्यावरणपूरक बस विभागाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.
प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे
अपघाताची कारणे
● वाहतूक कोंडी
● चालकांचा निष्काळजीपणा
● प्रभावी सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक योजनांचा अभाव
● आयुर्मान संपलेल्या बस सेवेत