पुणे : करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर राज्यात रविवारी जेएन.१च्या आणखी नऊ रुग्णांची नोंद झाली. त्यात ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. यामुळे आरोग्य यंत्रणांना आणखी दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देशात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर या उपप्रकाराचे गोव्यात काही रुग्ण आणि महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गमधील रुग्ण हा ४१ वर्षांचा पुरूष होता. आता जेएन.१चे आणखी ९ रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक ५ रुग्ण ठाणे महापालिका हद्दीत आढळले आहेत. या रुग्णांमध्ये ८ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यात ९ वर्षांचा एक मुलगा, २१ वर्षांची महिला, २८ वर्षांचा पुरूष आणि इतर रुग्ण ४० वर्षांवरील आहेत. केवळ पुण्यात आढळेल्या एका रुग्णाने परदेशवारी केली असून, तो अमेरिकेहून परतल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा : “मनोज जरांगेचा अजून अण्णा हजारे झालेला नाही”, डॉ. कुमार सप्तर्षी यांची टिप्पणी
राज्यामध्ये कोविड पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्यात सर्व जिल्ह्यांतील आरोग्य संस्थांचे मॉकड्रील घेण्यात आले आहे. त्यात द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचा समावेश आहे. सर्व जिल्हे, महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी या मॉकड्रीलमध्ये सहभाग नोंदविला. रुग्णालयातील उपलब्ध खाटा, अतिदक्षता विभाग, सुविधा, यंत्रसामग्री, ऑक्सिजन सुविधा, औषधसाठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडिसीनची सुविधा याबाबत रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा : लोणावळा : सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; सलग दोन दिवस वाहतूक विस्कळीत
करोनाचे दिवसभरात ५० रुग्ण
राज्यात रविवारी ५० नवीन करोना रुग्णांची नोंद करण्यात आली. राज्यातील करोना मृत्यूदर १.८१ टक्के आहे. राज्यभरात आज एकूण ३ हजार ६३९ जणांची करोना चाचणी करण्यात आली. आरोग्य विभागाने या नवीन उपप्रकाराच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. करोनासदृश लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात आढळून आलेल्या रुग्णांची कोविड चाचणी करण्यास आणि सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढविण्यास सांगण्यात आले आहेत.
हेही वाचा : शिक्षक, अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी का दिले?
“राज्यात सापडलेल्या जेएन.१ च्या नऊपैकी आठ जणांनी कोविडच्या लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. या सर्व रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्या सर्वांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे.” – डॉ. प्रतापसिंह सारणीकर, सहसंचालक, आरोग्य विभाग