पुणे : राज्यातील सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार असून, राज्यातील १ हजार २६ आयटीआयमध्ये १ लाख ४८ हजार ५६८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आयटीआयच्या शिक्षणानंतर रोजगारसंधी मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत गुणवंत विद्यार्थ्यांचाही आयटीआय प्रवेशाकडे कल वाढला आहे.
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून (डीव्हीईटी) आयटीआय पदविका अभ्यासक्रमाची प्रक्रिया राबवण्यात येते. दहावीचा निकाल जाहीर झाल्याने शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक डीव्हीईटीचे संचालक दिगंबर दळवी यांनी प्रसिद्ध केले. दहावीनंतर अकरावी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अशा पदविका अभ्यासक्रमांकडे न वळणारे विद्यार्थी आयटीआय अभ्यासक्रमांना पसंती देतात. १ हजार २६ आयटीआयमध्ये १ लाख ४८ हजार ५६८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यात ४१८ शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार ३६४ जागा, तर ६०८ खासगी आयटीआयमधील ५६ हजार २०४ जागांचा समावेश आहे.
हेही वाचा : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणार, बाल न्याय मंडळाचा आदेश
डीव्हीईटीने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर ५ जून ते १ जुलै या कालावधीत कागदपत्रांच्या पडताळणी करून प्रवेश अर्जाची निश्चिती करायची आहे. प्रवेश अर्ज निश्चित झाल्यानंतर ५ जून ते २ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना आयटीआय संस्थांचे पर्याय भरायचे आहेत. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी ४ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. ४ आणि ५ जुलै रोजी या यादीबाबतचे आक्षेप विद्यार्थ्यांना नोंदवता येतील. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ७ जुलैला प्रसिद्ध करण्यात येईल. प्रवेशाची निवड यादी १४ जुलैला प्रसिद्ध झाल्यावर १५ ते १९ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या संस्थेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेशाची दुसरी फेरी १५ जुलैपासून सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती https://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.