पुणे : राज्यात पावसाने सरासरी गाठली असून, राज्यभरात गुरुवारअखेर (२७ जून) सरासरीच्या ५२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लातूर विभागात झालेल्या दमदार पावसामुळे वेगाने पेरण्या झाल्या आहेत. कोकणात पुरेशा पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून, पुढील आठवड्यापासून रखडलेल्या पेरण्यांना गती येणार आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारअखेर (२७ जून) सरासरी १८७ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात सरासरीच्या १०१ टक्के म्हणजे राज्यात सरासरी १८९ मिमी पाऊस पडला आहे. कोकण विभागात सरासरी ५९६.३ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात सरासरीच्या ८४.२ टक्के म्हणजे ५०१.९ मिमी पाऊस झाला आहे. नाशिक विभागात सरासरीच्या १२५.७ मिमी पाऊस पडतो, यंदा ११२.७ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा जास्त १४१.७ मिमी पाऊस झाला आहे. पुणे विभागात १०९.३ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी १७८.७ मिमी पाऊस पडतो, प्रत्यक्षात १९५.४ मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १४३ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी १२०.६ मिमी पाऊस पडतो, यंदा १७२.४ मिमी पाऊस झाला आहे. अमरावती विभागात १०२.४ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी १३२.८ मिमी पाऊस होतो, यंदा १३६ मिमी पाऊस झाला आहे. नागपूर विभागात १०१.४ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी १८६.८ मिमी पाऊस होतो, यंदा १८९.४ मिमी पाऊस झाला आहे.

हेही वाचा : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

राज्यात शुक्रवारअखेर (२७ जून) सरासरीच्या ५१.९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. राज्यातील सरासरी पेरणी क्षेत्र १,४२,०२,३१८ हेक्टर आहे. त्यापैकी ७३,८३,४४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विभागनिहाय नागपूर विभागात २७.१० टक्के, अमरावती विभागात ४५.२८ टक्के, लातूर विभागात ६५.३५ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७९,४३ टक्के, कोल्हापूर विभागात ४७.३८ टक्के, पुणे विभागात ६७.२९ टक्के, नाशिक विभागात ४३.०२ टक्के आणि कोकण विभागात ३.८१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. लातूर विभाग पेरण्यांमध्ये आघाडीवर आहे. तर कोकण विभागात सर्वात कमी पेरण्या झाल्या आहेत.

हेही वाचा : पुणे: झिकाचा धोका कायम; एरंडवणा, मुंढव्यातील २० जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले

कोकण वगळता राज्यभरात पेरण्यांनी वेग घेतला आहे. मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे सर्वाधिक पेरा मराठवाड्यात झाला आहे. कोकण विभागात चालू आठवड्यात चांगला पाऊस होऊन सरासरी गाठली आहे, पुढील आठवड्यापासून कोकणात भात लागवडीला वेग येईल. राज्यात बियाणे, खतांची पुरेशी उपलब्धता आहे.

विनयकुमार आवटे, संचालक विस्तार आणि प्रशिक्षण