पुणे : ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’साठी राज्य सरकारने निश्चित केलेले १०० दिवसांचे उद्दिष्ट महावितरणने ६० दिवसांत दीड लाख सौर पंप बसवून पूर्ण केले. ‘महावितरण’चे अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मंळवारी ही माहिती दिली. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत महावितरणसाठी १६ मार्चपर्यंत दीड लाख पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, ४ फेब्रुवारीपर्यंतच दीड लाख सौर कृषी पंप बसवून ६० दिवसांतच ते पूर्ण केले आहे. यात जालना विभागाने १८,४९४ , बीड विभागाने १७,९४४, अहिल्यानगर विभागाने १३,३६६, परभणी विभागाने ११,७५५, संभाजीनगर विभागाने ९३२९, नाशिक विभागाने ९१४३, हिंगोली विभागाने ८५३८, धाराशीव विभागाने ६७६५, तर जळगाव विभागाने ६६४८ सौर पंप बसवले आहेत,’ असे चंद्र म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के आणि राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ १० टक्के रक्कम भरून सौर ऊर्जानिर्मिती करण्याचे सौर पॅनेल्स, कृषी पंप असा संपूर्ण संच देण्यात येतो. तर, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के असून, त्यांना ९५ टक्के अनुदान दिले जाते.

सौर पंपामुळे हवे तेव्हा सिंचन

‘सौर कृषी पंप बसविल्यावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने त्यांची अनेक दशकांची मागणी पूर्ण होते. हे पंप वीजजाळ्यावर अवलंबून नसल्याने शेतकरी दिवसा हव्या त्या वेळेला सिंचन करू शकतो. सौर कृषी पंप बसविण्याच्या बाबतीत राज्याने देशात आघाडी घेतली असून, गेल्या वर्षभरात या मोहिमेला विशेष गती आली आहे. राज्यात २०१५ पासून नऊ वर्षात महावितरणने १,०६,६१६ सौर कृषी पंप विविध योजनांच्या अंतर्गत बसविले होते. मात्र, जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात दीड लाख पंप बसवण्यात आले आहेत,’ असेही चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.