पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. शनिवारपर्यंत (ऑक्टोबर) राज्याच्या बहुतेक भागांत उघडीप असणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी शक्यता नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे रविवारी (२९ सप्टेंबर) उत्तर कोकण, ठाणे, पालघरमध्ये हलक्या सरी पडल्या आहेत. राज्याच्या उर्वरित भागात पावसाने उघडीप दिली आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. बंगलाच्या उपसागरात हवामान विषयक कोणतीही प्रणाली सक्रिय नसल्यामुळे बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत नाही. त्यामुळे राज्यभरात सध्या पावसाने उघडीप दिली आहे.
हेही वाचा : अदानी फाऊंडेशनला शाळा हस्तांतरण…शिक्षणमंत्र्यांचे म्हणणे काय?
दरम्यान, मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास रखडला आहे. २३ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू झाला, तो २४ सप्टेंबरपर्यंत कायम होता. पश्चिम गुजरात, राजस्थानसह पंजाब, हरियानाच्या काही भागांतून मोसमी वारे माघारी फिरले आहे. पण, २४ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास रखडला आहे. अद्याप तरी परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण नाही. पुणे, मुंबईतून १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान मोसमी वारे माघारी फिरतील. मुंबई – पुण्यातून साधारण पाच ऑक्टोबर दरम्यान मोसमी वारे माघारी फिरतात. मात्र, मागील काही वर्षांपासून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास रखडतो आहे, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.