पुणे : करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चे राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल ९१ रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात मागील २४ तासांत जेएन.१ च्या ७२ रुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर पुण्यासह ठाण्यामध्ये काही रुग्ण सापडले होते. राज्यात जेएन.१ चे गुरुवारी पुण्यात ७२ आणि नांदेड २, सोलापूर १, नागपूर १ असे ७८ नवीन रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. राज्यातील जेएन.१ च्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्क्यांहून अधिक पुण्यात आहेत. पुण्यातील ही रुग्णसंख्या ९१ वर पोहोचली आहे. त्याखालोखाल ठाण्यात ५ रुग्ण असून, बीड ३, छत्रपती संभाजीनगर २, नांदेड २, कोल्हापूर १, अकोला १, सिंधुदुर्ग १, नाशिक १, सातारा १, सोलापूर १, नागपूर १ अशी रुग्णसंख्या आहे. दरम्यान, पुण्यात गुरुवारी करोनाचे १५ नवीन रुग्ण आढळले.

हेही वाचा : ऊसतोड कामगारांना ३४ टक्के दरवाढ

राज्यात दोन जणांचा मृत्यू

राज्यात मागील २४ तासांत करोनामुळे दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सोलापूरमधील एक मृत्यू दिनांक ३१ डिसेंबर रोजी खासगी दवाखान्यात झाला असून, त्या रुग्णाचे वय ७३ वर्ष होते. तसेच त्या रुग्णाला मधुमेह, रक्तदाब आणि दमा हे सहव्याधी आजार होते. या व्यक्तीने करोना लशीच्या दोन मात्रा घेतल्या होत्या. कोल्हापूरमधील एक मृत्यू ३ जानेवारीला खासगी दवाखान्यात झाला असून, त्याचे वय १०१ वर्ष होते. तसेच त्या रुग्णाला हृदयरोग होता. त्याने करोना लशीची मात्रा घेतली नव्हती.

हेही वाचा : शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाला शनिवारपासून प्रारंभ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिरुर, मावळमध्ये प्रचार मेळावे

“राज्यात १ ते २८ डिसेंबर २०२३ या कालावधीतील आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात आले. त्याचा अहवाल ३ जानेवारीला मिळाला असून, त्यात ७८ जणांना जेएन.१ चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.” – डॉ. आर.बी.पवार, सहसंचालक, आरोग्य सेवा विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra total 110 covid jn 1 variant patients out of which highest 91 patients in pune print news stj 05 css
Show comments