पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील कुरबुरी पुढे येण्यास सुरुवात झाली असून शिवसेनेच्या (ठाकरे) जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत थेट शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी पुरंदर, इंदापूर, दौंड आणि बारामतीमधील कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत तक्रारी केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात काम करण्यासाठी राष्ट्रवादीचे (शरद पवार) कार्यकर्ते कचरत होते. त्यावेळी शिवसेनेने मोठे काम केले. मात्र, आता सुप्रिया सुळे यांच्याकडून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. कामासंदर्भात खासदार सुळे यांना दूरध्वनी केल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, अशा शब्दात कार्यकर्त्यांना नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संसदेच्या अधिवेशनावेळी सुळे यांच्याबरोबर चर्चा करण्यात येईल. पुरंदर, इंदापूर, दौंड आणि बारामती येथील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि सुळे यांच्यात लवकरच बैठक घेतली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या तक्रारी राष्ट्रवादीविरोधात नसल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे हक्काच्या आहेत. त्यांच्यासंदर्भात काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे. मात्र त्यावर मार्ग काढला जाईल, असे अंधारे यांनी सांगितले. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mahavikas aghadi shiv sena mp is upset with supriya sule pune print news apk 13 asj