पुणे : देशभरात यंदा ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या ५८ आलिशान घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी अशा केवळ १३ घरांची विक्री झाली होती. यंदा त्यात तब्बल २४७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यातील ९१ टक्के घरांची विक्री एकट्या मुंबईत झाली असून, पुण्यात अशा एकाही घराच्या विक्रीची नोंद झालेली नाही. ही घरे खरेदी करणार्यांमध्ये उद्योगपती, उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी आणि बॉलीवूड कलाकारांचा समावेश आहे.
देशातील प्रमुख सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला आहे. त्यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकता या महानगरांचा समावेश आहे. यानुसार, यंदा सात महानगरांमध्ये ४० कोटी रुपयांवरील किमतीची ५८ घरे विकली गेली. या घरांचे एकूण मूल्य ४ हजार ६३ कोटी रुपये आहे. मागील वर्षी केवळ अशा १३ घरांची विक्री झाली होती आणि त्यांचे एकूण मूल्य १ हजार १७० कोटी रुपये होते. यंदा विक्री झालेल्या घरांपैकी ५३ सदनिका आणि ५ बंगले आहेत. मागील वर्षी हे प्रमाण १० सदनिका आणि ३ बंगले असे होते. आलिशान घरांची विक्री मुंबईत सर्वाधिक आहे. एकट्या मुंबईत ५३ घरांची विक्री झाली असून, दिल्लीत चार आणि हैदराबादमध्ये एका घराची विक्री झाली आहे.
हेही वाचा… पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात
याबाबत अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, आलिशान घरांना करोना संकटानंतर मागणी वाढताना दिसत आहे. गुंतवणूक आणि वापर अशा दोन्ही कारणांसाठी या घरांना पसंती दिली जात आहे. राजकीय अस्थितरतेमुळे भांडवली बाजारात अस्थिरता निर्माण झाली असल्याने अतिश्रीमंतांचा गुंतवणुकीसाठी आलिशान घरांकडे ओढा दिसून येत आहे. अनेक आघाडीचे बांधकाम व्यावसायिक आता अशा घरांच्या निर्मितीकडे वळत आहेत.
हेही वाचा… पिंपरी: मोठी बातमी! महापालिका गृहनिर्माण संस्थांचे पाणी बंद करणार; ‘हे’ आहे कारण
आलिशान घरांची खरेदी करणाऱ्यांमध्ये उद्योगपतींचे प्रमाण अधिक आहे. मुंबईत ४० कोटी रुपयांवरील घरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांपैकी ७९ टक्के उद्योगपती आहे. त्याखालोखाल १६ विविध क्षेत्रांतील उच्चपदस्थ अधिकारी आणि उरलेल्या ५ टक्क्यांमध्ये राजकारणी व बॉलीवूड कलाकारांचा समावेश आहे.
मुंबईतील जागेची किंमत अधिक असून, घरांची बाजारपेठही सर्वांत मोठी आहे. त्यामुळे तिथे ४० कोटी रुपयांवरील घरांची विक्री सर्वाधिक झाली आहे. पुण्यातील घरांची बाजारपेठ तुलनेने छोटी असून, जागेचे दरही कमी आहेत. त्यामुळे पुण्यात अशा घरांना मागणी दिसून येत नाही.- आदिती वाटवे, प्रमुख, अनारॉक पुणे