पुणे : जापनीज इन्सेफेलायटिसला (मेंदूज्वर) प्रतिबंध घालण्यासाठी राज्यातील १ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबविली जाणार आहे. ही लसीकरण मोहीम मार्च महिन्यापासून पुण्यासह रायगड, परभणी या जिल्ह्यांत सुरू होईल. यानंतर या लसीकरणाचा समावेश नऊ महिने ते दीड वर्षाच्या मुलांना देण्यात येणाऱ्या नियमित लसीकरणात होणार आहे.
आरोग्य विभागाने मेंदूज्वर लसीकरण मोहिमेंतर्गत पहिला टप्पा गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पार पडला. आता दुसऱ्या टप्प्यात पुणे, रायगड, परभणी या जिल्ह्यांतील ५० लाख मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या जिल्ह्यांतील सरकारी आणि खासगी शाळा, अंगणवाड्यामध्येही लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. मुलांना ०.५ मिलीचा एक डोस देण्यात येईल. मेंदूज्वराच्या विषाणूच्या निर्मूलनाचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यामुळेच लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. डासांच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होतो. लसीकरणाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
हेही वाचा…पुण्याचे कोडे कायम
राज्य सरकारकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाला लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लस उपलब्ध झाल्यावर मार्चपासून लसीकरण सुरू करण्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे नियोजन आहे. पुणे शहरातील ११ लाख १८ हजार १९६ मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट महापालिका आरोग्य विभागाने ठेवले आहे. लसीकरणाची मोहीम एक महिना सुरू राहणार आहे. या कालावधीत महापालिकेच्या आरोग्य विभागाला लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे.
मेंदूज्वरामुळे ४० टक्के रुग्णांना अपंगत्व
जापनीज् इन्सेफेलायटिस (मेंदूज्वर) हा प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारा विषाणुजन्य आजार आहे. या आजाराचा विषाणू माणसाच्या शरीरामध्ये क्युलेक्स डासामार्फत प्रवेश करतो. त्यानंतर विविध लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात. या आजारामुळे ३० टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात, तर ४० टक्के रुग्णांमध्ये मेंदूच्या पेशी मृत झाल्यामुळे कायमचे शारीरिक व मानसिक अपंगत्व येऊ शकते. त्यामुळे १५ वर्षांच्या आतील वयोगटात अपंगत्व येण्याचे प्रमाण जास्त असते.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘ही’ नवीन गावे होणार समाविष्ट
पुण्यातील मेंदूज्वर लसीकरण कार्यक्रम
उद्दिष्ट : ११ लाख १८ हजार १९६
शाळा : ६२५
अंगणवाडी : ९६५
लसीकरण सत्रे : २,७६६