मावळ : पुण्याच्या मावळमध्ये आगामी लोकसभेवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे आगामी मावळ लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तशी त्यांनी इच्छा बोलून देखील दाखवलेली आहे. असं असताना आता उर्से टोल नाका येथे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे भावी खासदार म्हणून फलक लागले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुती असलेल्या नेत्यांचा डोळा असल्याचं पुन्हा एकदा बघायला मिळालं. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी याआधीच मावळ लोकसभेवर दावा केला असून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त उर्से टोलनाक्यावर भावी खासदार असा उल्लेख असलेले फ्लेक्स लागले आहेत. तर अजित पवार यांनी देखील मावळ लोकसभेवर नुकताच दावा केला होता.
हेही वाचा : लाल कांद्याच्या दरात घसरण; उच्चांकी आवक झाल्याचा परिणाम
त्यामुळे महायुतीतच मावळ लोकसभेवरून वाद होण्याची चिन्ह आहेत. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी मावळ लोकसभेवर दावा ठोकला आहे. मावळ लोकसभा उमेदवारी कोणाला मिळणार हे आगामी काळच ठरवेल. सध्या तरी बाळा भेगडे यांच्या भावी खासदाराच्या फलकामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे मात्र टेन्शन वाढवले आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. मात्र, आता याच लोकसभेवर महायुतीतील तिन्ही पक्षाचा डोळा असल्याचं या निमित्ताने पुढे आले आहे. तिन्ही पक्षांमध्ये मावळ लोकसभेवरून पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे.