पिंपरी-चिंचवड: विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला आमदार सुनील शेळके पाठोपाठ भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या समर्थकांनी विरोध केला आहे. श्रीरंग बारणे हे आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे मावळमधील बाळा भेगडे यांचे समर्थक अधिक आक्रमक झाले असून त्यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध केला आहे. बाळ भेगडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी बारणे यांच्या विरोधात सूर लावला. त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.
हेही वाचा : पिंपरी: पाच जलतरण तलाव अद्याप बंदच
मावळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी खासदार श्रीरंग बारणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला मुंबईत पोहचले आहेत. दुसरीकडे मतदारसंघात मात्र भाजप एकवटली आहे. आम्ही दोनवेळा बारणेंसाठी झटलो. पण आता आम्हाला बारणे उमेदवार नकोत. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना उमेदवारी द्या. असाच सूर या बैठकीत होता. भेगडेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी बारणेंना सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. अशात भाजपचे पदाधिकारीही भेगडेंसाठी आक्रमक झाले आहेत. सोमवारपर्यंत शिंदे गटाकडून बारणेंच्या उमेदवारीची घोषणा होणं अपेक्षित आहे. पण, त्याआधी होणारी ही बैठक बारणेंची डोकेदुखी आणखीनच वाढवणार हे निश्चित आहे.