पिंपरी : मावळ लाेकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दाेन अपक्षांनी माघार घेतल्याने ३३ उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे तीन उमेदवारांसाठी एक बॅलेट वाढणार असून एका मतदान केंद्रावर तीन बॅलेट युनिट लागणार आहेत. उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे निवडणूक विभागाची डोकेदुखी वाढली आहे. मावळ लाेकसभा मतदार संघात दि. १८ ते २५ एप्रिल दरम्यान ३८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. छाननीमध्ये तिघांचे अर्ज बाद झाले. तर, ३५ उमेदवारांचे अर्ज पात्र झाले हाेते. अर्ज माघार घेण्याची मुदत साेमवार ( २९ एप्रिल) पर्यंत हाेती. या मुदतीत भाऊसाहेब आडागळे आणि गाेपाल तंतरपाळे या दाेन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता मावळमधील चित्र स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे-पाटील, वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी आणि बहुजन समाज पार्टीचे राजाराम पाटील यांच्यासह ३३ जण निवडणूक रिंगणात आहेत. पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लाेकसभा मतदार संघातील चिंचवडमध्ये ५४९, पिंपरीत ४००, मावळमध्ये ३९०, पनवेलमध्ये ५४४, कर्जत ३३९ आणि उरणमध्ये ३४४ असे एकूण दोन हजार ५६६ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर तीन यानुसार मावळमध्ये एकूण सात हजार ६९८ बॅलेट युनिट लागणार आहेत.

हेही वाचा : पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं ‘उड्डाण’ कशामुळं रखडलं? अखेर समोर आलं कारण…

उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे एक बॅलेट युनिट वाढले

इलेक्ट्रॉनिक मतदान यत्रांवर (ईव्हीएम) मतदान संचाची क्षमता ‘नोटा’सह १६ इतकी असते. वरील १५ ठिकाणी उमेदवारांचा तपशील आणि सर्वात शेवटी ‘नोटा’ ( वरील पैकी कोणीही नाही)चे बटन राहते. दाेन यंत्रावर ३० उमेदवार राहणार असून तीन उमेदवारांमुळे एक बॅलेट युनिट वाढणार आहे. मावळमध्ये एकूण सात हजार ६९८ बॅलेट युनिट लागणार आहेत. तर, प्रत्येक मतदान केंद्रानुसार एक असे दोन हजार ५६६ ‘व्हीव्हीपॅट’ लागणार आहेत. पुरेसे मतदान यंत्रे उपलब्ध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे रेल्वे स्थानकातून बालकाचे अपहरण करणारा गजाआड; बालकाची सुखरुप सुटका

‘वंचित’ला ऑटोरिक्षा चिन्ह

उमेदवारी अर्ज माघारीनंतर अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. त्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांना ऑटोरिक्षा तर मारूती कांबळे यांना तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या संजोग पाटील यांना चिमणी हे चिन्ह मिळाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maval lok sabha 2024 election total number of candidates contesting is 33 pune print news ggy 03 css