पिंपरी : पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत झाली. पण, मतदानात चुरस दिसून आली नाही. मागीलवेळीपेक्षा पाच टक्क्यांनी मतदानात घट झाली आहे. घटलेल्या मताचा कोणाला फटका बसणार याचे आखाडे बांधण्यास सुरुवात झाली आहे. मावळमध्ये ५५.८७ टक्के मतदान झाले असून घाटाखालील उरण, कर्जत विधानसभा मतदारसंघात, सर्वाधिक तर पनवेलमध्ये सर्वांत कमी मतदान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार निवडून रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत बारणे आणि वाघेरे यांच्यातच झाली. मावळमध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. २५ लाख ८५ हजार १८ मतदारांपैकी केवळ १४ लाख १८ हजार ४३९ मतदारांनीच मतदानाचा हक्क बजाविला. त्यात सात लाख ७७ हजार ७४२ पुरुष तर सहा लाख ४० हजार ६५१ महिला आणि इतर ४६ जणांनी मतदान केले.

हेही वाचा : पिंपरी : मावळमधील ‘ईव्हीएम’ कुठे ठेवल्या? कशी आहे सुरक्षा व्यवस्था?

उरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. ३ लाख १९ हजार ३११ मतदारांपैकी दोन लाख १४ हजार १६९ मतदारांनी (६७.०७ टक्के) मतदान केले. उरणमध्ये भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार महेश बालदी आणि ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर यांनी जोर लावल्याचे दिसून आले. उरणमधून महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांच्या पारड्यात जास्त मते पडतील असा अंदाज लावला जात आहे. त्याखालोखाल कर्जत विधानसभा मतदारसंघात ६१.४० टक्के मतदान झाले. ३ लाख ९ हजार २०८ पैकी १ लाख ८९ हजार ८५३ जणांनी मतदान केले. कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात दुपारी अवकाळी पाऊस झाला. त्याचा मतदानावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

कर्जतमध्ये महायुती भक्कम होती. शिवसेनेचे आमदार महेंद्र धोरवे, भाजपमध्ये असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांनी जोर लावल्याचे दिसले. पनवेलमधील ५ लाख ९१ हजार ३९८ पैकी २ लाख ९५ हजार ९७३ (५०.०५ टक्के) मतदारांनी मतदान केले. पनवेलमध्ये सर्वांत कमी मतदान झाले असून भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शहरी भाग असल्याने बारणे यांना मताधिक्य मिळू शकेल, असे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या सुनील शेळके यांच्या मावळ विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ७३ हजार ४०८ पैकी २ लाख ६,९४९ (५५.४२ टक्के) लोकांनी मतदान केले. मावळमध्ये दोन्ही उमेदवारांना मतदान झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: पत्नीला शिवीगाळ केल्याने मित्राची हत्या; गुंडा विरोधी पथकाने आरोपीला ठोकल्या बेड्या

सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवडमध्ये ५२.२० टक्के मतदान झाले. ६ लाख १८ हजार २४५ पैकी ३ लाख २२ हजार ७०० जणांनी मतदान केले. भाजप पर्यायाने जगताप कुटुंबीयांचे वर्चस्व असलेल्या चिंचवड मतदारसंघात कमी मतदान झाल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे यांना सांगवी, रहाटणी, काळेवाडी भागात चांगले मतदान झाल्याची चर्चा आहे. तर, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात ५०.५५ टक्के मतदान झाले. ३ लाख ७३ हजार ४४८ पैकी १ लाख ८८ हजार ७९५ जणांनी मतदान केले. पिंपरीत वाघेरे यांचे वर्चस्व असून त्यांना आघाडी मिळू शकेल, असा अंदाज लावला जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maval lok sabha election 2024 55 87 percent voter turnout recorded pune print news ggy 03 css