पुणे : राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत रविवारी झालेल्या गणिताच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत २० ते २५ प्रश्नांबाबत तांत्रिक चुका झाल्याचा आरोप विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या मेहनतीवर या चुकांचा परिणाम होणार असल्याचे म्हणणेही मांडण्यात येत आहे. या संदर्भात आक्षेप नोंदवण्यासाठी ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ची सुविधा दिली जाणार असल्याचे स्पष्टीकरण सीईटी सेलकडून देण्यात आले.

राज्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘एमएचटी-सीईटी’ ही समाइक प्रवेश परीक्षा सीईटी सेलमार्फत घेण्यात येते. दोन टप्प्यांतील या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटाच्या परीक्षेचा पहिला टप्पा ९ ते १७ एप्रिल या कालावधीत घेण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून ३ लाख १ हजार ७२३ अर्ज केले होते. तर दुसऱ्या टप्प्यात १९ ते २७ एप्रिल या कालावधीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठी ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती.

एमएचटी-सीईटीमध्ये गणित या विषयाची परीक्षा झाली. मात्र, त्या प्रश्नपत्रिकेत २० ते २५ प्रश्नांमध्ये चुका असल्याचे काही विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे म्हणणे आहे. त्याबाबत समाजमाध्यमांमध्ये पोस्ट करण्यात आल्या आहेत. रविवारच्या पहिल्या सत्रातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील २० ते २५ प्रश्न, त्यांचे पर्याय चुकीचे होते. त्यामुळे ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे या संदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

२०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत ५० गुणांबाबतच्या चुका विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडवण्यासाठी पुरेसे आहेत. विद्यार्थ्यांनी दोन वर्षे परिश्रम केले आहेत. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे समाजमाध्यमांतील विविध पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या संदर्भात सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता ‘दरवर्षी ऑब्जेक्शन ट्रॅकरची सुविधा दिली जाते. तशी ती या वर्षीही दिली जाईल’ असे त्यांनी स्पष्ट केले.

‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ म्हणजे काय?

सीईटी सेलतर्फे ऑब्जेक्शन ट्रॅकर ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. त्यात परीक्षांतील प्रश्न-उत्तरांबाबत आक्षेप नोंदवता येतात. त्यासाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने संबंधित आक्षेप नोंदवावे लागतात. संबंधित आक्षेप नोंदवण्यासाठी शुल्क भरावे लागते. संबंधित आक्षेपांत तथ्य आढळल्यास त्यानुसार गुण देणे, उत्तरतालिकेत सुधारणा असे बदल करण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही.