पुणे : पावसाळ्यातील हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे पावसाळा सुरू झाल्यापासून मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने सर्दी आणि तापाच्या तक्रारी अधिक दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यात मुलांना सर्दी, जुलाब आणि त्वचाविकारांचा सर्वाधिक त्रास होतो. याशिवाय मुलांमध्ये डोकेदुखी, ताप, बद्धकोष्ठता, भूक न लागणे अशी अनेक लक्षणे दिसतात. डेंग्यू, हिवताप आणि चिकुनगुनियाचे रुग्ण पावसाळ्यात जास्त नोंदवले जातात. ही लक्षणे लहान मुलांमध्ये दिसल्यास पालकांनी दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पावसाळ्यात डास आणि माश्या वाढतात. माश्या अन्नावर बसतात तेव्हा अन्नातूनही अनेक रोग पसरतात. पावसाळ्यातील ओलाव्यामुळे विषाणू आणि जिवाणूही वाढतात. त्यामुळे फ्लू, दमा, ॲलर्जी होण्याची शक्यता असते, असे आरोग्यतज्ज्ञ डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले.

हेही वाचा : राज्यात ७८ तालुक्यांत अत्यल्प पाऊस, अवघ्या २४ टक्के क्षेत्रावर पेरणी

पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी अस्वच्छ पाणी साचते. अनेकदा मुले पावसाच्या पाण्यात खेळतात. लहान मुले कुठेही स्पर्श करतात आणि नंतर हाताची बोटे तोंडात घालतात. त्यामुळे ती आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. पालकांनी मुलांना अस्वच्छ पाण्यात खेळू देऊ नये. याचबरोबर घराभोवती पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डॉ अभिमन्यू सेनगुप्ता यांनी दिला.

पावसाळ्यात कोणती काळजी घ्याल?

  • पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा.
  • उघड्यावरील आणि शिळ्या अन्नाचे सेवन टाळावे.
  • पिण्याचे पाणी उकळून घ्यावे.
  • थंडी, ताप, अतिसार झाल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
  • पाणी पाच दिवसांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवू नये.
  • घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा.

हेही वाचा : Porsche Car Accident : पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या वडीलांना जामीन मंजूर, पण तरीही कोठडीतच राहावं लागणार

पावसाळा सुरू झाल्याने पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजारांचा प्रसार होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून घ्यावे. याचबरोबर सर्दी, ताप, जुलाब यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात उपचार घ्यावेत.

डॉ. कल्पना बळीवंत, प्रभारी आरोग्य अधिकारी, महापालिका
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In monsoon the number of children falling ill has increased how to take care of children pune print news stj 05 css
Show comments