नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सत्यशिल सोपानशेठ शेरकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी अशोक भगवंत घोलप यांची बिनविरोध निवड झाली अशी माहिती अध्यासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जुन्नर -आंबेगांव, गोविंद शिंदे यांनी सांगितले. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या नेतृत्वाखालील शिवनेर पॅनेलचे १७ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले होते तसेच ४ उमेदवार मोठ्या फरकाच्या मताधिक्क्याने विजयी झालेले आहेत. आज ( २४ मार्च ) सकाळी ११ वाजता कारखाना साईट निवृत्तीनगर येथील कारखाना सभागृहामध्ये पदाधिकारी निवडीकरीता विघ्नहर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांची अध्यासी अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली .

श्री विघ्नहर कारखान्याच्या चेअरमनपदाकरीता सत्यशिल सोपानशेठ शेरकर यांचा एकमेव अर्ज दाखल होता. विघ्नहरच्या चेअरमनपदी सत्यशिल शेरकर यांची निवड व्हावी अशी सुचना संचालक संतोष बबन खैरे यांनी मांडली त्यास अनुमोदन संचालक विवेक विठ्ठलराव काकडे यांनी दिले. तर व्हाईस चेअरमनपदी अशोक भगवंत घोलप यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. व्हाईस चेअरमनपदी अशोक घोलप यांची निवड व्हावी अशी सुचना संचालक धनंजय आनंदराव डुंबरे यांनी मांडली त्यास अनुमोदन संचालक देवेंद्र लक्ष्मण खिल्लारी यांनी दिले. चेअरमन व व्हाईस चेअरमनपदा करीता एकच अर्ज असल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहिर करण्यात आले. याप्रसंगी निवडणुक पथक प्रमुख सचिन मुंढे, विघ्नहर कारखान्याचे आजी-माजी संचालक, सभासद, ऊस उत्पादक व अधिकारी वर्ग उपस्थित होते. तसेच नवनिर्वाचित चेअरमन , व्हा.चेअरमन यांचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी व सर्व अधिकारी, कामगार व कर्मचारी यांचे वतीने सन्मान केला .

या निवडी नंतर बोलताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, शेतकरी समृध्द झाला पाहिजे हा स्व. शेठबाबा व स्व. अण्णांचा विचार, ध्येय समोर ठेवून आणि सभासद शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून आजपर्यंत कारखान्याचा आजी माजी संचालक मंडळाने वाटचाल केली आहे. कारखान्याचे सर्व सभासद शेतकरी, व विघ्नहर परिवार आणि शेरकर कुटुंबाचे नाते कायम जिव्हाळ्याचे राहीले आहे. चेअरमन पदाची विश्वासाने पुन्हा एकदा माझ्यावर दिलेली जबाबदारी स्विकारुन सभासद शेतकरी बांधवांच्या हितासाठी मी कायम कटीबध्द राहील.