पिंपरी : ‘रिव्हर कन्झर्वेशन’ आणि ‘दुर्गा टेकडी मिशन’च्या वतीने निगडीतील दुर्गा टेकडीवर मानवी साखळीच्या माध्यमातून नदी विकास, टेकडीवरील जलकुंभाच्या प्रकल्पाला विरोध केला. या आंदोलनात २५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. सकाळी व्यायामासाठी आलेल्या नागरिकांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला.

दुर्गा टेकडीवरील निसर्गसंपन्न जागांचे संरक्षण आणि पर्यावरणाच्या ऱ्हासास प्रतिबंध घालण्यासाठी जागरूक नागरिकांनी एकत्र येत ‘मानवी साखळी’ तयार केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नदी विकास प्रकल्पासह इतर पुनर्विकास योजनांचा निषेध करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या आंदोलनात २५० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी व्यायामासाठी आलेल्या नागरिकांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला. त्यांनी पर्यावरण रक्षणाचे संदेश असलेले फलक हातात घेतले आणि समाजमाध्यमांवर छायाचित्रे शेअर करून जनजागृती केली.

प्रस्तावित जलकुंभ आणि इतर विकासकामांमुळे दुर्गा टेकडीवरील निसर्गसंपत्ती धोक्यात येणार असल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला. “झाडतोड थांबवा!”, “नद्यांना आधी स्वच्छ करा!”, “नद्यांचे जतन, नाही तर रिकाम्या खुर्च्या!” अशा घोषणा देत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी एकजूट दाखवली. नद्यांवरील कृत्रिम बंधारे, जलतट सौंदर्यीकरण आणि जैवविविधतेला धोका पोहोचवणाऱ्या प्रकल्पांचा विरोध करण्यात आला. स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि वैज्ञानिक तज्ज्ञांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. शहरात विविध भागांत हे आंदोलन पोहोचवण्यासाठी मोहिम राबवण्यात येणार आहे.

नद्यांच्या दयनीय स्थितीबाबत चिंता

पिंपरी-चिंचवडमधील नद्या अनेक वर्षांपासून प्रदूषण आणि दुर्लक्षाचा सामना करत आहेत. विविध स्तरांतून सातत्याने मागणी असूनही ठोस उपाययोजना होत नाहीत. नद्या केवळ जलस्रोत नसून त्यांचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व देखील आहे, हे नागरिकांनी अधोरेखित केले.

दरम्यान, भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनीही या प्रकल्पांविरोधात निषेध नोंदवला. नद्यांचे उपचार करा, सौंदर्यीकरण नको, वृक्षतोड थांबवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘जुने लोक पूर्वी नदीमध्ये पोहायला जाता होते. आता पाणी प्रचंड खराब झाले आहे. करोनाच्या काळात आम्ही नदीकिनारी जात होतो. पण आता परत घाण वाढली आहे. वृक्षतोड थांबली असती, तर पक्षी आणि प्राणी दिसले असते. पण, आता ते दिसत नाहीत. वृक्षतोड थांबली नाही आणि प्राण्यांचे घर नष्ट झाले, तर ते कुठे जातील? त्यांनाही त्यांच्या घराचा हक्क आहे. आपण निसर्ग आणि नैसर्गिक ठिकाणांचे रक्षण केले पाहिजे’, असे आंदोलनात सहभागी झालेला ११ वर्षीय प्रज्ञेश चिंचवडे म्हणाला.