पिंपरी : आमच्या भागात गणपतीची वर्गणी का गोळा करता, असे म्हणत तरुणाला टोळक्याने कोयत्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना चिखलीत घडली.महेश प्रदीप गुणेवाड (वय २१) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रज्वल रोकडे, मानव रोकडे, ओम नरवडे, यश नरवडे (सर्व रा. रोकडे वस्ती, चिखली) व त्यांच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश हे रिक्षा चालक असून सहका-यांसह रोकडे वस्ती परिसरात गणपती उत्सवासाठी वर्गणी गोळा करत होते. आरोपी कोयते, काठ्या, हॉकी स्टिक व लोखंडी रॉड हातामध्ये घेऊन तिथे आले. आरोपींना पाहून परिसरातील दुकानदारांनी भीतीने दुकाने बंद केली. महेश हे सोन्या तापकीर याची रिक्षा चालवत आहेत, याचा आरोपींना राग होता. आरोपींनी ‘आमच्या परिसरात वर्गणी का गोळा करता’ असे म्हणत महेशला लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. तसेच डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. महेशच्या खिशातील वर्गणीचे १४ हजार रुपये, त्याच्याकडील चार हजार रुपये असे १७ हजार रुपये हिसकावून घेतले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
हे ही वाचा…दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध गुन्हा
दरम्यान, गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तालयाच्या नियमानुसार नोंदणी करावी. बळजबरीने वर्गणी गोळा केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गणेशोत्सवात ध्वनीवर्धकाचा आवाज मर्यादेत ठेवावा असे आवाहन पोलीस आयुक्त
विनयकुमार चौबे यांनी केले आहे.