पिंपरी : जागेच्या खासगी वाटाघाटीसंदर्भात आठ आठवड्यांत योग्य तो निर्णय घेऊन माहिती देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने याचिकाकर्त्याने अवमान याचिका दाखल केली. त्यामुळे माहिती देण्यास जाणीवपूर्वक विलंब केल्याचा ठपका ठेवत एक कनिष्ठ, एक उपअभियंत्याला निलंबित केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नीलेश दाते हे स्थापत्य विभागात कनिष्ठ, तर राजकुमार सूर्यवंशी हे उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. महापालिकेने कासारवाडी येथे खासगी वाटाघाटींद्वारे जागा घेतली होती. मात्र, या वाटाघाटीच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीमध्ये न्यायालयाने भूसंपादनाबाबत आठ आठवड्यांत योग्य तो निर्णय घेऊन त्या निर्णयाची याचिकाकर्त्यांना माहिती द्यावी, असा आदेश महापालिकेला दिला होता.
हेही वाचा : पिंपरी : प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका, तीन दिवसांत ३० लाख दंड वसूल
न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुदतीत प्रस्ताव ठेवून कार्यवाही करण्याची जबाबदारी दाते आणि सूर्यवंशी यांची होती. मात्र, त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर पालिकेने दाते आणि सूर्यवंशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला. त्यांचा खुलासा समाधानकारक नव्हता. या दोघांनी वेळीच कार्यवाही केली असती, तर महापालिकेच्या विरोधात अवमान याचिका दाखल झाली नसती. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल दाते व सूर्यवंशी यांचे सेवानिलंबन करून खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड: कमरेला पिस्तूल लावून दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांना बेड्या; गुन्हे शाखा दोनची कारवाई
नाट्यगृहाच्या पैशांचा अपहार करणारा लिपिकही निलंबित
महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात संकेत जंगम हे लिपिक पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे नाट्यगृहाच्या कार्यक्रमाची अनामत रक्कम, भाडे यासह इतर शुल्क वसूल करणे, पावत्या देणे, दैनंदिन भरणा लेखा शाखेकडे जमा करणे, दप्तर अद्ययावत ठेवणे असे कामकाज दिले होते. मात्र, ११९ कार्यक्रमांचे चार लाखांचे भाडे त्यांनी कोषागारात भरले नाही. या पैशांचा अपहार केला आहे. लेखापरीक्षणात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे दिसून आले. सात लाख ६६ हजार रुपयांची रक्कम वसूलपात्र आहे. धनादेश कोषागारात भरले नाहीत. त्यामुळे जंगम यांचे निलंबन करत खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे.