पिंपरी : मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह अटक केलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याच्या मोटारीतून आणखी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. त्याला सकाळीच पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पिंपळेनिलख रक्षक चौकात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या नमामी झा या हॉटेल कामगाराला पोलिसांनी दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह अटक केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन कोठून आणले याची विचारणा पोलिसांनी केल्यावर नमामीने निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शेळके याचे नाव घेतले. चौकशी केली असता शेळकेचा सहभाग स्पष्ट झाला. त्याला ४४ किलो ७९० ग्रॅम किलो वजनाच्या ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे मेफेड्रोनसह अटक करण्यात आली होती.
हेही वाचा : मोठी नोकर भरती! पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘या’ पदासाठी मागविले अर्ज
शेळकेला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली असून सकाळीच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अटकेदरम्यान उपनिरीक्षक शेळके याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. चौकशी दरम्यान त्याच्या मोटारीत आणखी मेफेड्रोन असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन शेळके याच्या मोटारीतून जप्त केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शेळके याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.