पिंपरी : वाढत्या वाहतूककोंडीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आणि वाहतूक पाेलिसांनी शहरातील ८० चाैकांची पाहणी केली असता, २५ चाैकांत सर्वाधिक वाहतूककोंडी हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे. आता या चाैकांतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाने उपाययाेजना हाती घेतल्या असून, पुढील सहा महिन्यांत कोंडीमुक्ती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक कारखान्यांसह हिंजवडी, तळवड्यातील माहिती तंत्रज्ञाननगरी, देहू-आळंदी तीर्थक्षेत्र, नामांकित शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे वाहनांची संख्याही अधिक असते. बेशिस्त वाहनचालक, रस्त्यालगतची अतिक्रमणे अशा कारणांमुळे सकाळी आणि सायंकाळी अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडी होते. या कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर, वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या ८० चाैकांची पाहणी केली. त्यानंतर तीन वेळा बैठकांमध्ये चर्चा करून सतत वाहतूककोंडी होणारे २५ चाैक निश्चित करण्यात आले आहेत. आता संबंधित चाैकातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठीच्या उपाययोजनांची चाचपणी करण्यात येत आहे.

राज्य शासनाने शंभर दिवसांत विविध कार्यक्रम ठरवून दिले आहेत. या कार्यक्रमानुसार वाहतूककाेंडीच्या २५ चाैकांपैकी पहिल्या टप्प्यात नऊ चाैकांतील काेंडी साेडविण्यासाठी उपाययाेजना सुरू करण्यात आल्या आहेत. संबंधित चाैकांत वाहतूक पाेलिसांकडून मदतनीस, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल) बदल करणे, एकेरी वाहतूक करणे, चाैकात वाहतुकीच्या दृष्टीने बाेलार्ड बसविणे, मार्गात बदल असे उपाय करण्यात येणार आहेत.

पादचाऱ्यांसाठी ‘स्पीड’ टेबल

शहरातील विविध चाैक माेठ्या आकाराचे आहेत. त्यामुळे अशा चाैकांत वाहतूककाेंडीही अधिक प्रमाणात हाेत असल्याचे पाहणीतून निदर्शानास आले आहे. अशा माेठ्या चाैकांमध्ये विविध उपाययाेजना करण्यात येत आहेत. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी ‘स्पीड टेबल’ तयार करण्याचे महापालिकेचे नियाेजन आहे.

वाहतूककाेंडीचे २५ चाैक

भारतमाता चाैक, गोडाउन चौक, देहू फाटा, बोऱ्हाडेवस्ती चौक, चिखली चाैक, त्रिवेणीनगर चौक, डांगे चौक, वाकड चाैक, काळा खडक राेड, भूमकर चाैक, फिनिक्स माॅल परिसर, भुजबळ चाैक, ताथवडे भुयारी मार्ग, पुनावळे भुयारी मार्ग, लक्ष्मी चाैक, थरमॅक्स चाैक, टिळक चाैक, खंडाेबा माळ चाैक, फिनाेलेक्स चाैक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक, नाशिक फाटा, दापाेडी चाैक, भोसरी बसस्थानक, तळवडे चाैक, गणेशनगर चाैक या चौकात सर्वाधिक वाहतूककोंडी होत असल्याचे दिसून आले आहे.

शहरातील ८० चाैकांची पाहणी केल्यानंतर वाहतूककाेंडीचे २५ चाैक निश्चित करण्यात आले. सुरुवातीला नऊ चाैकांतील काेंडी साेडविण्यासाठी काम केले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित चाैकांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पुढील सहा महिन्यांत संबंधित चौक कोंडीमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे शहरी दळणवळण विभागाचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.

Story img Loader