पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुळा नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असताना नदीकाठावरील ३३ झाडे विनापरवाना तोडल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी उद्यान विभागाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत महापालिकेचे उद्यान सहायक अनिल गायकवाड यांनी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमनुसार फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०० काेटींचे कर्जराेखे उभारून मुळा नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात वाकड बायपास ते सांगवी येथील पुलापर्यंतचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना पिंपळेनिलख येथील अवैध वृक्षतोड झाल्याची तक्रार पर्यावरणप्रेमींनी केली होती. त्यानुसार उद्यान विभागाने नदीकाठी जाऊन पाहणी केली.

पिंपळेनिलख येथील पंचशीलनगर, इंगवल चौकाशेजारील मुळा नदी काठावरील एकूण २१ वृक्ष तोडल्याचे दिसून आले. त्यात दोन सुबाभूळ, एक कडुलिंब, १७ काटेरी बाभुळ या झाडांचा समावेश आहे. तर, पिंपळे निलख स्मशानभूमी शेजारील बारा झाडे तोडण्यात आली आहेत. त्यात दोन काटेरी बाभूळ, तीन सुबाभूळ, पाच करंज, एक उंबर, एक विलायची चिंच या झाडांचा समावेश आहे. नदीकाठी विनापरवाना वृक्षतोड झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे उद्यान विभागाचे सहायक आयुक्त उमेश ढाकणे यांनी सांगितले.