पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील जलद गती वाहतूक (बीआरटी) मार्गातून खासगी वाहने चालविणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. बीआरटी मार्गातून वाहन चालविल्यास पहिल्यांदा ५०० रुपये दंड केला जाणार आहे. एकदा कारवाई केल्यानंतर पुन्हा त्या वाहनाने बीआरटी मार्गातून वाहन चालविले, तर १५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. खासगी वाहनांना प्रवेश बंद असल्याचा आदेश पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी प्रसृत केला आहे.
नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषणमुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी ‘बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम’ अर्थात बीआरटीएस मार्ग शहरात उभारण्यात आले आहेत. सद्या बीआरटी मार्गिकेमध्ये अनेक प्रकारची हलकी व जड, अवजड वाहने प्रवेश करत आहेत. त्यामुळे बीआरटी मधील स्टील रेलिंग, बस थांब्याचे वारंवार नुकसान होत आहे. रस्त्याचे विद्रुपीकरण होऊन वाहतुकीची शिस्त बिघडत आहे.
हेही वाचा : कार्ड घ्या अन् मेट्रोतून बिनधास्त प्रवास करा! ‘एक पुणे कार्ड’ला प्रवाशांची पसंती
खासगी वाहनांमुळे अपघातात वाढ होवून जिवीत व वित्तहानी होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असणाऱ्या बीआरटी मार्गातून बीआरटी बसशिवाय अन्य वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामध्ये केवळ अग्निशमन, पोलीस वाहने आणि रुग्णवाहिका यांना सवलत देण्यात आली आहे. बीआरटी मार्गातून खासगी वाहने गेल्यास वाहन चालकांकडून पहिल्यांदा ५०० रुपये दंड घेतला जाईल. एकदा कारवाई केल्यानंतर देखील पुन्हा त्या वाहनाने बीआरटी मार्गातून प्रवास केला. तर, १५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.